पिंपरी चिंचवड, दि. 21 - कल्याणी फोर्ज कंपनीतील अकाऊंटंट निलेश गायकवाड यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी कल्याणी फोर्ज कंपनीचे मालक अमित कल्याणी यांच्या नावाचाही उल्लेख केला आहे. चाकणमधील एका हॉटेलमध्ये निलेश गायकवाड यांनी विष प्राशन करुन स्वतःचं आयुष्य संपवले. तीन दिवसांपासून ते येथील गंधर्व हॉटेलमध्ये राहत होते, मात्र दोन दिवसांपासून त्यांनी रुमचा दरवाजा न उघडल्याने हॉटेल व्यवस्थापनाला संशय आला. दरवाजा उघडण्यात आल्यानंतर निलेश यांनी आत्महत्या केल्याचे पाहून हॉटेल व्यवस्थापनाला धक्काच बसला. याची माहिती तातडीनं पोलिसांना देण्यात आली. याप्रकरणी चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्येपूर्वी निलेशनं लिहिलेल्या चिठ्ठीत 'कल्याणी फोर्ज' कंपनीचे मालक अमित कल्याणी यांचे नाव आहे. अमित कल्याणी यांना एका व्यवहारासाठी निलेशने तब्बल 15 कोटी रुपये घेऊन दिले होते. त्यापैकी साडे अकरा कोटी रुपये अमित यांनी परत केले. मात्र उर्वरित रक्कम आणि निलेशचे 60 लाखाचे कमिशन देण्यास अमित टाळाटाळ करत होते. तर दुसरीकडे 15 कोटी रुपये देणारी संबंधित व्यक्ती निलेशच्या मागे पैशासाठी तगादा लावून बसली होती. या कारणानंच निलेशनं आत्महत्या करण्याचे टोकाचं पाऊल उचलले. दरम्यान, याप्रकरणी प्रख्यात उद्योजक बाबा कल्याणी यांचा मुलगाअमित कल्याणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.