- २५ नगरसेवकांचे राजीनाम्याचे दबावतंत्रमुंबई, दि. ८ - शिवसेना-भाजपा पाठोपाठ आता काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूसही बाहेर पडू लागली आहे़. काँगे्रसचे माजी खासदार गुरुदास कामत यांचा राजीनामा पक्षश्रेष्ठींनी रद्द करावा, यासाठी त्यांच्या समर्थकांनी मुंबई प्रदेश कार्यालयासमोर आज शक्तिप्रदर्शन केले़. मात्र याची दखल पक्षाने न घेतल्यास २५ जण राजीनामा देतील, असा बंडच काँग्रेस नगरसेवकांनी पुकारला आहे़ ऐन निवडणुकीत काँग्रेसला हा मोठा झटका असून महापालिकेतील विरोधी पक्षनेते पदही यामुळे संकटात येण्याची चिन्हे आहेत़.पुढच्या वर्षी महापालिकेची निवडणूक असल्याने पक्षांतराचे वारे वाहू लागले आहेत़ त्याच दरम्यान काँग्रेसमधील गटबाजीही चव्हाट्यावर आली आहे़. कामत यांनी मंगळवारी पक्षातील आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे़. ही नाराजी पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचण्यासाठी कामत समर्थक नगरसेवक व कार्यकर्त्यांनी आज तीव्र निदर्शने केली़.
२५ नगरसेवक राजीनाम्याच्या तयारीतआपल्या नेत्याचा राजीनामा पक्षश्रेष्ठींनी नाकारावा यासाठी कामत समर्थक नगरसेवकांनी दबावतंत्र सुरु केले आहे़. त्यानुसार पालिकेतील काँग्रेसच्या संख्याबळाच्या निम्मे म्हणजे २५ नगरसेवक राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत़. कामत यांचा राजीनामा रद्द करा, नाहीतर गुरुवारी २५ नगरसेवक राजीनामा देतील, असा सज्जड इशाराच या समर्थकांनी दिला आहे़. देवेंद्र आंबेरकर, ज्योत्सना दिघे, मोहसीन हैदर, भौमसिंग राठोड, शितल म्हात्रे, सुषमा राय, चंगेझ मुल्तानी हे काही नगरसेवक कामत समर्थक म्हणून ओळखले जातात़.विरोधी पक्षनेते पद संकटातमहापालिकेत काँग्रेसचे ५१ नगरसेवक असून गुरुदास कामत आणि काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम असे दोन गट आहेत़. या दोन्ही गटांमध्ये आपले वर्चस्व दाखवून देण्यासाठी चढाओढ सुरु असते़. कामत गटाचे देवेंद्र आंबेरकर यांचा पत्ता साफ करुन निरुपम गटाचे प्रवीण छेडा यांची काही महिन्यांपूर्वी विरोधी पक्षनेते पदी नियुक्ती झाली़. मात्र कामत गटही आता आक्रमक झाले आहे़ निरुपम गटाला शह देण्यासाठी राजीनामा देण्याचे हत्यारचं त्यांनी उपसले आहे़. २५ नगरसेवकांनी राजीनामा दिल्यास काँग्रेस विरोधी बाकावरील सर्वात मोठा पक्ष राहणार नाही़ त्यामुळे विरोधी पक्षनेते पदही संकटात येईल़.कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहनदरम्यान, गुरुदास कामत यांनी आपल्या समर्थकांना मोर्चा काढणे, राजीनामा देण्यास मनाई केली आहे़. तसेच निदर्शने करु नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे़.