लोकसभेला भाजपला बसला फटका! चंद्रशेखर बावनकुळेंच्या मतदारसंघात मविआचं गणित काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 03:36 PM2024-11-11T15:36:46+5:302024-11-11T15:39:58+5:30

Maharashtra Assembly Election 2024: लोकसभा निवडणुकीत भाजपला कामठी विधानसभा मतदारसंघात धक्का बसला होता. या मतदारसंघात महाविकास आघाडीला मताधिक्य मिळाले होते.  

Kamathi Assembly Constituency Election 2024 contest is between Chandrashekhar Bawankule of BJP and Suresh Bhoyer of Congress | लोकसभेला भाजपला बसला फटका! चंद्रशेखर बावनकुळेंच्या मतदारसंघात मविआचं गणित काय?

लोकसभेला भाजपला बसला फटका! चंद्रशेखर बावनकुळेंच्या मतदारसंघात मविआचं गणित काय?

जितेंद्र ढवळे, कामठी (नागपूर)
Kamthi Vidhan Sabha Election 2024: दलित, मुस्लीम, कुणबी, तेली मतांवर भिस्त असलेल्या कामठी मतदारसंघात लोकसभेत महायुतीला १७ हजार ५३४ मतांचा फटका बसला. त्यामुळे विधानसभेत कामठीचे मैदान वाचविण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे स्वतः निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत.

बावनकुळेंना रोखण्यासाठी काँग्रेसने माजी जि. प. अध्यक्ष सुरेश भोयर यांना संधी देत परिवर्तनचा संकल्प केला आहे. मात्र, भोयर यांना याही वेळी भाजपपेक्षा स्वः पक्षीयांचेच आव्हान आहे. 

अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या कामठीत २०१९ मध्ये भाजप नेतृत्वाने बावनकुळे यांना अखेरच्या क्षणी संधी नाकारली होती. मात्र, यावेळी पहिल्याच यादीत बावनकुळे यांचे नाव आल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये डबल जोश दिसून येत आहे. 

विद्यमान आमदाराचे भाजपने कापले तिकीट

येथे भाजपने विद्यमान आमदार टेकचंद सावरकर यांचे तिकीट कापत बावनकुळे यांच्या संघटन कौशल्यावर विश्वास ठेवला आहे. २०१९ मध्ये भाजपच्या मजबूत संघटनेच्या बळावर सावरकर विधानसभेत पोहोचले होते. त्यामुळे लोकसभेत जरी महाविकास आघाडीला कामठीत लीड मिळाला असला, तरी विधानसभेत बावनकुळेंना रोखताना कॉग्रेसला घाम फुटणार आहे.

१९ उमेदवार रिंगणात असलेल्या कामठीत बसपाने विक्रांत सुरेंद्र मेश्राम, वंचित बहुजन आघाडीने प्रफुल्ल मानके, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (ए) अमोल वानखेडे, पीपल्स पार्टी ऑफ इंडियाने (डेमोक्रेटिक) जगदीश वाडीभस्मे, राष्ट्रीय समाज पक्षाने नफीस अब्दुल अलीम शेख, भीमसेनेने नितीन सहारे, जय विदर्भ पार्टीने प्रशांत नखाते, आजाद समाज पार्टीने (कांशीराम) प्रशांत बन्सोड, आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडियाने विजय डोंगरे यांना संधी दिली आहे. याशिवाय ८ अपक्षांनीही दंड थोपाटले आहेत.

मुस्लीम मतांच्या विभाजनाचा भोयर यांना फटका?

कामठी शहर आणि नागपूर ग्रामीणमध्ये आघाडी घेणारा उमेदवारच कामठीचा आमदार ठरतो, हे वास्तव आहे. मात्र याही वेळी कामठीतून काँग्रेसशी संबंधित स्थानिक मुस्लीम नेत्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करीत भोयर यांच्यापुढे आव्हान उभे केले आहे. 

यात काँग्रेस माजी नगराध्यक्ष शहाजहा शफाहत अंसारी (साजा सेठ) यांचे भाऊ अपक्ष उमेदवार फिरोज अहमद अंसारी, माजी नगरसेवक नविद अख्तर मो. रफिक नवीद, तर सुलेमान अब्बास चिराग अली हैदरी यांचा समावेश आहे. या तिघांसह फैय्याद अहमद अंसारी हेही अपक्ष निवडणूक लढवित आहेत.

Web Title: Kamathi Assembly Constituency Election 2024 contest is between Chandrashekhar Bawankule of BJP and Suresh Bhoyer of Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.