मुंबई : राज्य पोलीस दलातील विशेष अभियानाचे प्रमुख डी. कनकरत्नम व अपर महासंचालक (सामग्री व तरतूद) हेमंत नगराळे यांना गुरुवारी महासंचालकपदी बढती देण्यात आली. त्यांची अनुक्रमे राज्य सुरक्षा महामंडळ व न्यायिक व तांत्रिक (एल अॅण्ड टी)पदी पदोन्नतीवर बदली करण्यात आली. तर गेल्या सुमारे पावणे दोन वर्षांपासून पूर्णवेळ अधिकाऱ्यापासून रिक्त असलेल्या राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्तपदी महामार्ग पोलीस विभागाच्या अपर महासंचालक रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संमतीनंतर गृह विभागाने गुरुवारी त्याबाबतचे आदेश जारी केले. महासंचालक पदाच्या दोन रिक्त पदांबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने १ आॅक्टोबरला दिले होते. सेवाज्येष्ठतेच्या आधारावर कनकरत्नम व नागराळे यांना बढती देण्यात आली असून दोघेही जण १९८७च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे राज्यातील डीजीची मंजूर असलेली सर्व आठ पदे भरण्यात आली आहेत.एसीबीच्या महासंचालकपदी नियुक्त करण्यात आलेल्या संजय बर्वे यांच्याकडे गेल्या पावणे दोन वर्षांपासून एसआयडीचा अतिरिक्त पदभार होता. या ठिकाणी यापूर्वीया पदावर काम पाहिलेल्या रश्मी शुक्ला यांच्यावर पुन्हा ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.याचप्रमाणे आस्थापना विभागाचे अपर महासंचालक असलेले संदीप बिष्णोई यांची महामार्ग वाहतूक पदावर बदली करण्यात आली आहे. त्यांचा अतिरिक्त पदभार अपर महासंचालक (प्रशासन) प्रज्ञा सरवदे यांच्याकडे सोपवण्यात देण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाºयांकडून सांगण्यात आले.
कनकरत्नम, नगराळे यांना महासंचालकपदी बढती; रश्मी शुक्ला यांची गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 2:17 AM