- मनोहर कुंभेजकर मुंबई - संपूर्ण जगाला व्यापणाऱ्या कोविड महामारीला तोंड देण्यासाठी मुंबई महापालिकेने ताब्यात घेतलेले कांदिवली पूर्व येथील ईएसआयएस रुग्णालयातील काही वॉर्ड अखेर पुन्हा रुग्णालयाकडे हस्तांतरीत केले. या रुग्णालयाला केंद्रीय मंत्री व उत्तर मुंबईचे स्थानिक खासदार पीयूष गोयल यांनी गेल्या रविवारी भेट दिली होती. त्यावेळी हे वॉर्ड अद्यापही पालिकेकडेच असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याबाबतचे निर्देश दिले. त्यानंतर तातडीने ही कार्यवाही झाली असून आता या वॉर्डांमध्ये ईएसआयएसच्या रुग्णांची सोय होणार आहे.
महापालिकेने कोविड-१९ प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी वर्ष २०२०-२१ दरम्यान ईएसआयएस रुग्णालयातील काही वॉर्डस् व्यापले होते. आता कोविड-१९ महामारी संपली असून आपण आपल्या रुग्णालयाच्या नियमित वॉर्ड्सचा वापर सुरू करू शकता. तसेच वॉर्ड्समधील साहित्य पुढील सात दिवसांत हलवले जाईल, असे मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे उपायुक्त संजय कुऱ्हाडे यांनी पत्राद्वारे ईएसआयएस रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकांना कळवले आहे.