मुंबई : रिपब्लिक टीव्हीचा संपादक अर्णब गोस्वामीविरोधात शिवसेनेने हक्कभंग प्रस्ताव सादर केलेला असताना आता अभिनेत्री कंगना राणौतवरही हक्कभंग प्रस्ताव दाखल झाला आहे. महत्वाचे म्हणजे कंगनाने पंगा घेतलेल्या शिवसेनेने नाही तर महाआघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने हा प्रस्ताव दाखल केला आहे.
कंगनाने मुंबई ही पीओकेसारखी वाटते, मुंबई कोणाच्या बापाची नाही, मुंबई पोलिसांपेक्षा माफिया बरे अशी वक्तव्ये केली होती. यावरून महाराष्ट्रासह अभिनेते, नेत्यांनी तिच्यावर टीकेची झोड उठविली होती. कंगनाच्या विरोधात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी आघाडी उघडली होती. यावरून वेगवेगळे राजकीय रंग देण्याचे सुरु असताना आता काँग्रेसने कंगनाविरोधात हक्कभंग सादर केला आहे.
अभिनेत्री कंगना राणावतने मुंबईची तुलना पीओकेसोबत केली होती. तसेच मुंबई पोलिसांवरही टीका केली होती. या वादाचे पडसाद आता पावसाळी विधानसभा अधिवेशनावर दिसत आहेत. सोमवारी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी एक पत्र दिले होते. या पत्रात मुंबई बदनामी करणाऱ्या कंगना राणौतवर कारवाई करा, अशी मागणी करण्यात आली होती. आज गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कंगना राणौतविरोधात निषेध करणारा ठराव मांडला आहे.
'मुंबईत परप्रांतीय मुलगी येते नाव कमावते आणि महाराष्ट्र मुंबईचा अपमान करत असे बेताल आणि खेद जनक वक्तव्य करते. महाराष्ट्राची बदनामी सहन करणार नाही, मुंबई पोलिसांची बदनामी सहन करणार नाही, असे अनिल देशमुख यांनी सांगितले. यावर कंगना राणावतने बेताल वक्तव्य केले आहे, तिच्यावर कारवाई करा, अशी मागणी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केली आहे.
हक्कभंग प्रस्तावकाँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी विधानपरिषदेत कंगनाविरोधात हक्कभंग मांडला. कंगनाने एका मुलाखतीत ड्रग्स घेतल्याचे सांगितले होते. अशा महिलेने महाराष्ट्राबद्दल काहीही बेताल वक्तव्य केले आहे. मुंबई आणि महाराष्ट्र राज्याच्या एका परंपरेच्या मर्यादा ओलांडल्या आहेत, अशा महिलेच्या विरोधात हक्कभंग आणत असल्याचे भाई जगताप यांनी सांगितले.