ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. १९ - अभिनेता ह्रितिक रोशन बनावट ईमेल आयडी प्रकरणी पोलीस अभिनेत्री कंगना राणावतची चौकशी करणार आहेत. ह्रितिक रोशनचे वकिल दिपेश मेहता यांनी सोमवारी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त पुरावे पोलिसांकडे दिले आहेत. साक्षीदार म्हणून कंगना राणावतची 30 एप्रिलला चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलीस सोमवारी 18 एप्रिललाच कंगनाच्या घऱी जाऊन तिची चौकशी करणार होते. यावेळी तिच्या कंम्प्युटर आणि मोबाईलचीदेखील तपासणी करण्यात येणार होती. मात्र कंगना उपलब्ध नसल्याची माहिती तिच्या वकिलांनी दिल्यानंतर पोलिसांनी तारीख पुढे ढकलली आहे.
अभिनेता ह्रितिक रोशनने त्याच्या नावे बनावट ईमेल आयडी तयार करण्यात आला असून त्याच्या चाहत्यांसोबत या ईमेल आयडीद्वारे संपर्क साधला जात असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केलेली आहे. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथील सायबर क्राईम पोलीस ठाण्यात ही तक्रार करण्यात आलेली आहे. ह्रितिकने दिलेल्या तक्रारीत ही व्यक्ती माझ्या नावे मेल आयडीद्वारे कंगना राणावतशीदेखील संपर्क साधत होती अशी माहिती दिली आहे.
दिपेश मेहता यांनी पोलिसांकडे दिलेल्या पुराव्यांमध्ये 40 ईमेल्सची माहिती दिली आहे. हे मेल कंगना राणावतने ह्रितिक रोशनच्या ख-या ईमेल-आयडीवर पाठवले होते. 24 मे 2014 नंतर हे मेल पाठवण्यात आले आहेत. 24 मार्चला ह्रतिक रोशनने बनावट ईमेल आयडीची तक्रार केली होती.
'24 मे 2014ला करण जोहरच्या वाढदिवसाच्या पार्टीत कंगना राणावत मला भेटली होती. यावेळी तिने 'क्वीन' चित्रपटाचं कौतुक केल्याबद्द्ल माझे आभार मानले होते. यावेळी तिने मला मी पाठवलेल्या ईमेल्स बद्दल सांगितले. यावेळी मी तिला क्वीन चित्रपट पाहिलाच नसल्याचं, तसंच तो मेल आयडी माझा नसल्याचंही सांगितलं होतं', अशी माहिती ह्रितिक रोशनने तक्रारीत दिली आहे.