ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. २४ - मुंबईतून पुण्याकडे विमानाने जात असताना मानसज्योती डेक्का नावाच्या एका सहप्रवाशाने आपल्यावर हल्ला करून गळा दाबण्याचा प्रयत्न केला, असा दावा जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमारने केला आहे. मात्र, जेट एअरवेज व मुंबई पोलिसांनी कन्हैयाचा हा दावा फेटाळत केवळ धक्का लागल्याने त्यांच्यात बाचाबाची झाल्याचे म्हटले आहे. कन्हैयाशी वाद झालेला सहप्रवाश्याने ही कन्हैयाचा आरोप फेटाळून लावला आणि कन्हैयाने पब्लिसिटी स्टंट केल्याचे म्हटले. त्या प्रवाशाचे नाव मानसज्योती डेक्का असे आहे. याप्रकरणी पोलिसांनी मानसज्योती डेक्का या कोलकत्याच्या तरुणाला ताब्यात घेतले आहे. कन्हैयाकुमारच्या सहकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार त्याच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीसांनी डेक्का यांची विचारपूस केली असता तो म्हणाला 'मी कोलकत्याहून कामानिमित्त पुण्यासाठी जात होता. कन्हैया कोण आहे, हे मला माहितही नाही. माझा त्याला चुकून धक्का लागला; मात्र त्याने व त्याच्या सहकाऱ्यांनी नाहक आरडाओरड करीत गोंधळ घातला. प्रसिद्धीसाठी त्याने हा स्टंट केला आहे. मी भाजपा, आरएसएस नव्हे तर किंवा कोणत्याही पक्षाशी माझा काही संबंध नाही. मीही त्याच्याविरुद्ध तक्रार देण्याचा विचार करीत आहे.'> कन्हैया व त्याच्या सहकाऱ्यांची मानस ज्योती डेक्का या प्रवाशाबरोबर विमानात सीटवर बसल्यानंतर शुल्लक कारणावरुन वादावादी झाल्याचे आतापर्यंत तपासातून स्पष्ट झाले आहे. याबाबत सर्वांचे जबाब नोंदविण्यात आले असून डेक्काकडे कसून चौकशी केली आहे. त्याच्याकडून कोणतीही आक्षेपार्ह बाब पुढे आलेली नाही. याबाबत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला . -देवेन भारती (सहआयुक्त, कायदा व सुव्यवस्था)