ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २५ - सरकारमध्ये सहभागी असूनही सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातल्या फडणवीस सरकारला लक्ष्य करणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कन्हैया कुमारच्या निमित्ताने पुन्हा एकदा मोदींवर निशाणा साधला आहे. कन्हैया कुमार ही भाजपची देणगी असल्याचे उद्धव यांनी म्हटले आहे.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठात राष्ट्रविरोधी कार्यक्रम करणा-या गटाचे नेतृत्व कन्हैयाने केले व त्याबद्दल राष्ट्रद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक करून त्याला तुरुंगात पाठवले, पण राष्ट्रद्रोहाचा हा आरोपी झटपट जामिनावर सुटून बाहेर आला कसा हे एक राजकीय गौडबंगाल आहे. अशा आरोपाखाली लोक वर्षानुवर्षे तुरुंगात सडत आहेत. पण कन्हैया मात्र मोकाट सुटला. त्यामुळे आता त्याचे नरडे दाबून प्रसिद्धी स्टंट करण्याची योजना कशाला? असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.
मोदी हे आता जागतिक नेते बनले असले तरी शेवटी हिंदुस्थानचे पंतप्रधान म्हणूनच त्यांची ही जगभ्रमंती सुरू आहे. त्यामुळे हिंदुस्थानची जनता दुष्काळाने होरपळत व तहान-भुकेने तडफडत असताना मोदी यांनी स्वदेशात राहून जनतेची फिकीर करावी असा सल्लाही मोदींना दिला आहे.
अग्रलेखातील मुद्दे
कन्हैयाचा गळा दाबल्याने त्याचा आवाज बंद होण्याची शक्यता नाही. खरं तर गळा दाबावा असे लोक आपल्या सभोवताली आहेत. ‘‘भारतमाता की जय बोलणार नाही’’ अशी मग्रुरीची भाषा करणार्या ओवेसीचा गळा दाबायला हे लोक पुढे येणार नाहीत. पठाणकोटचा बदला घेऊ असे आमचे संरक्षणमंत्री सांगतात, पण पाकिस्तानचा गळा दाबण्याची हिंमत दाखवणार आहात काय? असे अनेक प्रश्न देशात विचारले जात आहेत. कन्हैयाचा गळा दाबलात, पुढे काय? हा प्रश्न त्यातलाच आहे.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठात राष्ट्रविरोधी कार्यक्रम करणार्या गटाचे नेतृत्व कन्हैयाने केले व त्याबद्दल राष्ट्रद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक करून त्याला तुरुंगात पाठवले, पण राष्ट्रद्रोहाचा हा आरोपी झटपट जामिनावर सुटून बाहेर आला कसा हे एक राजकीय गौडबंगाल आहे. अशा आरोपाखाली लोक वर्षानुवर्षे तुरुंगात सडत आहेत. पण कन्हैया मात्र मोकाट सुटला. त्यामुळे आता त्याचे नरडे दाबून प्रसिद्धी स्टंट करण्याची योजना कशाला? कन्हैया काल मुंबई-पुण्यात येऊन गेला. ज्याप्रमाणे पाकिस्तानच्या कसुरीसाठी सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवला तसा बंदोबस्त कन्हैयासाठी ठेवून त्याची सभा होऊ दिली. सरकारला याबाबतीत ठोस निर्णय घेता आला असता, पण असे ठोस निर्णय फक्त हिंदुत्ववादी किंवा अखंड महाराष्ट्रवादी यांच्याच बाबतीत घेतले जातात हे दुर्दैव म्हणावे लागेल.
कन्हैयाची पंतप्रधानांवरील टीका आम्हाला मान्य नाही. अर्थात मोदी हे आता जागतिक नेते बनले असले तरी शेवटी हिंदुस्थानचे पंतप्रधान म्हणूनच त्यांची ही जगभ्रमंती सुरू आहे. त्यामुळे हिंदुस्थानची जनता दुष्काळाने होरपळत व तहान-भुकेने तडफडत असताना मोदी यांनी स्वदेशात राहून जनतेची फिकीर करावी या लोकभावना आहेत. देश टिकला तर आपले जागतिक स्तरावरचे नेतृत्व टिकेल. महाराष्ट्रासह देशातील १० राज्यांमधील २५६ जिल्ह्यांमध्ये दुष्काळ असून तेथील तब्बल ३३ कोटी जनता दुष्काळाच्या फे-यात तडफडत आहे. मराठवाड्यातील अनेक भागात पाण्याचा टिपूस नाही व तेथील जनतेने मुंबई-ठाण्यात स्थलांतर केले असून त्यांच्या झुणका-भाकरीची सोय जमेल तशी शिवसेनेने केली. आपली भावंडे, पोरं-बाळं, आया-बहिणी उपाशी असताना शिवसेनेच्या घशाखाली तरी घास कसा उतरेल? मराठवाड्यात दोन-दोन महिने पाणी मिळत नाही. या दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी दोनेक दिवस काढले असते तर बरेच झाले असते. सध्या त्यांचे निवडणूक दौरेही जोरात आहेत. आसाम, पश्चिम बंगालातही मोदीसाहेब प्रचार सभा घेत आहेत, पण महाराष्ट्राचा आक्रोश ऐकून ते येथे पोहोचू शकले नाहीत हे दु:ख मराठवाड्याच्या मनात खदखदत आहे व कन्हैयाकुमारसारख्या टिनपाटांना त्यामुळे बोलायला विषय मिळाला आहे.
पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करावी अशी लायकी कन्हैयाची नाही, पण कन्हैयाची मूर्ती घडवून त्यात राजकीय प्राण फुंकणारे कोण, त्याचे आत्मपरीक्षण भाजपने केले तर बरे होईल. निवडणुकीपूर्वी मोदी यांनी जी स्वप्ने दाखवली ती अद्याप पूर्ण झालेली नाहीत. देशात अच्छे दिन आणणार, विदेशातील काळा पैसा परत आणणार, वर्षाला दोन कोटी रोजगार निर्माण करणार अशा अनेक घोषणा लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांनी विकल्या होत्या, पण पंतप्रधान झाल्यावर त्या घोषणांची अंमलबजावणी झालेली नाही. आता मोदी यांनाच लोक ‘ओएलएक्स’वर विकतील अशी वायफळ भाषा कन्हैयाकुमारने केली आहे. कन्हैयाकुमारचा बोलवता धनी कुणी वेगळाच असावा असे आता वाटू लागले आहे. मराठवाड्यातील भयंकर दुष्काळासंदर्भात कन्हैयाचे बोलणे योग्य आहे, पण मराठवाड्याचे अश्रू पुसायला शिवसेना धावपळ करते आहे. कन्हैयासारखे येतील व जातील, पुढे काय? तसेच त्याचे नरडे दाबूनही उपयोग नाही. कन्हैयाचा गळा दाबल्याने त्याचा आवाज बंद होण्याची शक्यता नाही. खरं तर गळा दाबावा असे लोक आपल्या सभोवताली आहेत. ‘‘भारतमाता की जय बोलणार नाही’’ अशी मग्रुरीची भाषा करणार्या ओवेसीचा गळा दाबायला हे लोक पुढे येणार नाहीत. पठाणकोटचा बदला घेऊ असे आमचे संरक्षणमंत्री सांगतात, पण पाकिस्तानचा गळा दाबण्याची हिंमत दाखवणार आहात काय? असे अनेक प्रश्न देशात विचारले जात आहेत. कन्हैयाचा गळा दाबलात, पुढे काय? हा प्रश्न त्यातलाच आहे.