मुंबई : मुंबईतून पुण्याकडे विमानाने जात असताना मानसज्योती डेक्का नावाच्या एका सहप्रवाशाने आपल्यावर हल्ला करून गळा दाबण्याचा प्रयत्न केला, असा दावा जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमारने केला आहे. मात्र, जेट एअरवेज व मुंबई पोलिसांनी कन्हैयाचा हा दावा फेटाळत केवळ धक्का लागल्याने त्यांच्यात बाचाबाची झाल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी मानसज्योती डेक्का या कोलकात्याच्या तरुणाला ताब्यात घेतले आहे. कन्हैया कुमारच्या सहकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार त्याच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे सुमारे अडीच तास कन्हैयाला छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर थांबून राहावे लागले. शिवाय, नियोजित विमान प्रवास रद्द झाल्याने त्याने अखेर सहकाऱ्यासमवेत दुपारी मोटारीने पुण्याकडे प्रयाण केले.
विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी, लोकभारती पक्षाचे आमदार कपिल पाटील आदींच्या समवेत कन्हैया आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहचला. धीरज भारत शर्मा व अन्य तिघा सहकार्यासमवेत तो जेट एअरवेजच्या (९व्हीआय-६१८) विमानात बसला. विमान उड्डाणास काही मिनिटांचा अवधी बाकी असताना, कन्हैयाच्या बाजूच्या सीटवर बसलेल्या मानसज्योती नागेंद्र डेक्का (३३) या तरुणाबरोबर त्याचा वाद झाला. कन्हैयाच्या म्हणण्यानुसार, मानस ज्योतीने अंगावर येत गळा दाबण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे विमानातील सुरक्षा रक्षकांनी त्यांच्याकडे धाव घेत त्यांना समजाविण्याचा प्रयत्न केला. डेका यास विमानातून उतरविण्यात आले. त्या पाठोपाठ कन्हैया व त्याचे साथीदारही विमानातून खाली उतरले व घडला प्रकार त्यांनी विमानतळावरील पोलिसांना सांगितला.
कन्हैया व त्याच्या सहकार्यांची मानस ज्योती डेक्का या प्रवाशाबरोबर विमानात सीटवर बसल्यानंतर क्षुल्लक कारणावरून वादावादी झाल्याचे आतापर्यंत तपासातून स्पष्ट झाले आहे. याबाबत सर्वांचे जबाब नोंदविण्यात आले असून, डेक्काकडे कसून चौकशी केली आहे. त्याच्याकडून कोणतीही आक्षेपार्ह बाब पुढे आलेली नाही. याबाबत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला .- देवेन भारती (सहआयुक्त, कायदा व सुव्यवस्था)
कन्हैयाचा पब्लिसिटी स्टंट - डेक्कामी कोलकात्याहून कामानिमित्त पुण्यासाठी जात होतो. कन्हैया कोण आहे, हे मला माहीतही नाही. माझा त्याला चुकून धक्का लागला. मात्र, त्याने व त्याच्या सहकार्यांनी नाहक आरडाओरड करीत गोंधळ घातला. प्रसिद्धीसाठी त्याने हा स्टंट केला आहे. मी भाजपा, आरएसएसचा नव्हे किंवा कोणत्याही पक्षाशी माझा काही संबंध नाही. मीही त्याच्याविरुद्ध तक्रार देण्याचा विचार करीत आहे.- मानसज्योती डेक्का (कन्हैयाशी वाद झालेला सहप्रवासी)