मुंबई : कन्हैया कुमारच्या मुंबई प्रवेशावरून वातावरण तापले असून, शनिवारी होणाऱ्या विद्यार्थी मेळाव्यात कन्हैया नेमकी काय भूमिका मांडणार, याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. कन्हैयाचे भाषण होऊ नये, म्हणून पोलिसांनी सुरुवातीला परवानगी देण्यात वेळकाढूपणा केल्याचा आरोप आयोजकांनी केला. तथापि, रात्री उशिरा पोलिसांनी सभेला परवानगी दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. धर्मांध शक्तींच्या विरोधासाठी विचारमंथन करण्यासाठी डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटना एकत्र आल्या आहेत. शनिवारी, २३ एप्रिल रोजी वरळी गावातील जनता शिक्षण संस्थेमध्ये दुपारी २ वाजता भेदभावाविरुद्ध युवा विद्यार्थी मेळावा होणार होता. तथापि, जनता शिक्षण संस्थेने दिलेली परवानगी ऐनवेळी नाकारल्याने शुक्रवारी मेळाव्याचे ठिकाण बदलण्यात आले. टिळकनगर येथील आदर्श विद्यालय या ठिकाणी दुपारी २ वाजता मेळावा घेण्याचा निर्णय सर्व संघटनांनी घेतला आहे. मेळावा उधळवण्याचा इशारा देणाऱ्या हिंदुत्ववादी संघटनांचा बंदोबस्त करू, असा इशाराही आयोजक संघटनांनी दिला आहे.पोलिसांची सभेला परवानगीपोलीस उपायुक्त संग्रामसिंग निशाणदार आणि नेहरू पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र झेले यांच्याशी झालेल्या बैठकीत कन्हैयाच्या सभेला परवानगी देण्याचा निर्णय झाला. संबंधित शाळेने आयोजकांना परवानगी दिली असल्याने आम्हीही या कार्यक्रमासाठी परवानगी दिली असल्याचे झेले यांनी ‘लोकमत’ला सांगितले. सुरक्षेची खबरदारी पोलीस घेणार आहेत.> विद्यार्थी मेळाव्याचे वेळापत्रकदुपारी २ ते ३एल्गार आणि इतर ग्रुप सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील.दुपारी ३ ते ५माजी न्यायमूर्ती बी. जे. कोळसे-पाटील हे दुसऱ्या सत्राचे उद्घाटन करतील. यावेळी डॉ. राम पुनियानी, जयंत पवार, अॅड. इरफान इंजिनीअर, तिस्ता सेटलवाड यांची भाषणे होतील.
कन्हैयाच्या कार्यक्रमाला परवानगी
By admin | Published: April 23, 2016 3:42 AM