लोकमत न्यूज नेटवर्क
सावंतवाडी : सिंधुदुर्ग वनविभागात पुन्हा एकदा बदली वॉर सुरू झाले असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरत काही अधिकाऱ्यांनी क्रिम पोस्टिंगसाठी प्रयत्न चालवले आहेत. यातून कणकवली वनक्षेत्रपाल दीपक सोनवणे यांचा कातकरी प्रकरणात बळी दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. मुख्य वनसंरक्षकांनी आपल्या मर्जीतील माणसाला रत्नागिरीतून आणून कणकवलीचा कार्यभार दिल्याची चर्चा वनविभागात जोर धरू लागली असून, या मागे वनविभागातील शकूनीमामा वेगळाच असल्याचे बोलले जात आहे.
कणकवली येथे कातकरी समाज्याच्या काही लोकांना माराहण झाल्यानंतर त्यांनी तेथील पाच वनकर्मचाऱ्यांवर जातीवाचक शिवीगाळ व माराहण प्रकरणी गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणात वनविभागाची नाचक्की झाली असतना आता वनविभागातील अंर्तगत वादाला तोंड फुटले आहे. वनमंत्र्याच्या मर्जीतील असलेले दीपक सोनवणे यांना चक्क कणकवली वनक्षेत्रपाल प्रभारी पदी बसवण्यात आले होते. पण वनमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर त्याच्या मर्जीतील अधिकाऱ्यांचा काटा काढण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. त्यातील पहिला बळी दीपक सोनवणे हे ठरले आहेत. कातकरी माराहण प्रकरणात कर्मचाऱ्यांच्या पाठीशी वनक्षेत्रपाल राहिले नाही, असा ठपका ठेवून त्यांना अचानक बाजूला करण्यात आले आहे. मात्र हे प्रकरण झाले तेव्हा सोनवणे यांना उपवनसंरक्षक शाहाजी नारनवर यांनी मुंबई येथे सरकारी कामासाठी पाठवले होते. मग ते पाठीशी राहिले नाही हे कितपत योग्य, असा सवाल आता वनकर्मचारीच विचारायला लागले आहेत.
दुसरीकडे ज्या रमेश कांबळे यांना कणकवली वनक्षेत्रपाल पदाचा कार्यभार देण्यात आला त्यांची बरीच वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सेवा झाली असून, रत्नागिरी येथे त्यांची फिरत्या पथकात बदली झाली. पण त्यांचा कार्यकाल अद्याप पूर्ण झाला नाही, असे असतना सिंधुदुर्ग मधील कार्यभार रत्नागिरीतील अधिकांऱ्यांकडे कसा काय देण्यात आला, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. त्यातच चिपळूण वनक्षेत्रपालपदी अद्याप कोणतीही व्यक्ती नाही मग कणकवली वरच एवढी मेहरबानी का? यात सोनवणेंचा बळी देऊन आपल्या मर्जीतील अधिकाऱ्याला या जागेवर आणल्याची चर्चा सध्या सुरू असून, या बदली प्रकरणात एक निवृत्त अधिकारी पडद्यामागून सूत्रे हलवत असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, या प्रकरणी माजी आमदार परशुराम उपरकर यांनीही कणकवली येथील अधिकाऱ्यांना एवढ्या तडकाफडकी का हटवले, याची माहिती सध्या घेत असून, या प्रकरणात पडद्यामागून कोणता निवृत्त अधिकारी सूत्रे हलवत असेल तर मुख्य वनसंरक्षकांनी वेळीच सावध व्हावे अन्यथा त्यांच्या विरोधात आम्ही मुख्यमंत्र्याकडे तक्रार करणार आहोत. एखाद्या अधिकाऱ्याची पूर्ण चौकशी होणे गरजेचे आहे. असे असताना त्याला का बदलण्यात आले तसेच कणकवलीतील जागेवर रत्नागिरीतील व्यक्ती कशासाठी, असा सवाल ही उपरकर यांनी विचारला आहे.
अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे दाद मागणार
कणकवली वनक्षेत्रपाल दीपक सोनवणे यांनी आपल्यावर अन्याय झाला असून,आपण लवकरच अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे दाद मागणार असल्याचे सांगितले आहे. माझ्याबाबत तक्रारी आहेत. तर मग माझे स्पष्टीकरण न घेताच का कारवाई करण्यात आली, असा सवाल सोनवणे यांनी विचारला आहे. कातकरी प्रकरणात माझी कोणतीही चूक नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.