मुंबई : विधान परिषदेच्या मुंबईतील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत भाजपाची चांगलीच दमछाक झाली. मुंबई पदवीधर मतदारसंघात शिवसेनेच्या विलास पोतनीस यांनी भाजपावर मात केली, तर लोकतांत्रिक जनता दलाचे कपिल पाटील यांनी विजयाची हॅट्ट्रिक करून, शिक्षक मतदारसंघावरील आपले वर्चस्व सिद्ध केले. नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेनेची विजयाकडे घोडदौड सुरू आहे.कपिल पाटील यांच्या पराभवासाठी भाजपा व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सर्व ताकद पणाला लावली होती. मात्र, पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेत त्यांनी भाजपाच्या मनसुब्यांवर पाणी फेरले. कपिल पाटील यांच्यासमोर भाजपाचे अनिल देशमुख, सेनेचे शिवाजी शेंडगे होते. त्या दोघांना पाटील यांच्या निम्मी मतेही मिळाली नाहीत. एकूण ८,३५३ मतांपैकी पाटील यांनी ४,५०० मते खेचली.भाजपामध्ये प्रवेश करून कोकण पदवीधरच्या मैदानात उतरलेले निरंजन डावखरे यांनी तो गड राखला. त्यांनी सेनेचे संजय मोरे यांचा पराभव केला. राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला तिसऱ्या क्रमांकावर गेले.
कपिल पाटील यांची हॅट्ट्रिक, मुंबईत शिवसेनेचे पोतनीस विजयी; कोकणात भाजपाचे डावखरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 06:54 IST