ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 27 - एअर इंडियाच्या कर्मचा-याला चप्पलेने मारणारे खासदार रवींद्र गायकवाड यांचा मुद्दा आज संसदेतही गाजला. शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांनी मद्यधूंद अवस्थेत गैरवर्तन करणाऱ्या कॉमेडी किंग कपिल शर्मावर कारवाई कोणतीही कारवाई झाली नाही तर रवींद्र गायकवाड यांच्यावर कारवाई का असा सवाल उपस्थित केला. गायकवाड यांचं कृत्य चुकीचं होतं पण सर्व विमान कंपन्यांनी त्यांच्यावर बंदी घालणं चुकीचं आहे असं म्हणत अडसूळ यांनी गायकवाड यांच्यावरील बंदी हटवण्याची मागणी केली.
लोकसभा स्पीकर सुमित्रा महाजन यांनी गोंधळ घालण्यावर नाराजी व्यक्त करत नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांसोबत चर्चा करून हा मुद्दा सोडवावा असं सांगितलं, तर राज्यसभेत समाजवादी पक्षाचे खासदार नरेश अग्रवाल यांनी गायकवाड यांच्यावर बंदी घालणं म्हणजे एअर इंडियाची दादागिरी असल्याचं म्हटलं.
एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला विमानात मारहाण केल्याप्रकरणी रवींद्र गायकवडांविरोधात शुक्रवारी (दि.24) दिल्लीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला . एअर इंडियाच्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला. त्याआधी देशातल्या प्रमुख एअरलाईन्स कंपन्यांनी रवींद्र गायकवाड यांना काळ्या यादीत टाकत, त्यांच्या विमान प्रवासावर निर्बंध आणले आहेत. त्यामुळे दिल्लीहून मुंबईत परतण्यासाठी रेल्वेने प्रवास करण्याची नामुष्की त्यांच्यावर आली.
दरम्यान कॉमेडी किंग कपिल शर्मानेही ऑस्ट्रेलियातून परतताना विमानात मद्यधूंद अवस्थेत गोंधळ घालत आपल्या सहका-यांसोबत गैरवर्तन केलं होतं.