- ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10 - महापालिकेने लाच मागितल्याचा आरोप केल्यानंतर स्वत:च अडचणीत सापडलेल्या कॉमेडी किंग कपिल शर्माने आता आपली बाजू सावरण्याचा पुर्ण प्रयत्न करताना दिसत आहे. 'मी फक्त काळजी व्यक्त केली होती, मात्र त्याने अनावश्यक वादाचं रुप घेतलं. माझा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही आणि होण्याची इच्छाही नाही. पंतप्रधानांसोबत केंद्र आणि राज्य सरकारचा मी आदर करतो. भ्रष्टाचाराविरोधात हा माझा राग होता जो मी ट्विटरवर व्यक्त केला,' असं स्पष्टीकरण देत कपिल शर्माने आपल्यावरील रोष कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.
महापालिकेने आपल्याकडे लाच मागितल्याचा आरोप कपिल शर्माने केला होता. 'मी गेली 5 वर्ष न चुकता 15 कोटींचा आयकर भरत असतानाही माझ्या कार्यालयासाठी महापालिकेला 5 लाखांची लाच द्यावी लागते, हेच का तुमचे अच्छे दिन ?', असं ट्विट करत कपिल शर्माने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेशही दिले.
Had expressed my concerns. It took shape of unnecessary controversy. Not a part of any political org and nor do I intend to be: Kapil Sharma— ANI (@ANI_news) September 10, 2016
Have utmost respect for PM&Govts,both Union&States.This was my anger agnst corruption that I expressed on twitter-Kapil Sharma on his tweets— ANI (@ANI_news) September 10, 2016
मात्र काही वेळानंतर कपिल शर्माचा ट्विटर बॉम्ब त्याच्यावर उलटला. ज्या बांधकामासाठी लाच मागितली असल्याचा आरोप कपिल शर्माने केला होता ते बांधकाम अवैध होतं, आणि त्यासंबंधी 16 जुलै 2016 रोजी नोटीसदेखील पाठवली होती अशी माहिती महापालिकेने दिली होती. या नोटीसमध्ये कपिल शर्माला बांधकाम तात्काळ थांबवण्याचे आदेश देण्यात आले होते. या नोटीसची एक प्रत वर्सोवा पोलिसांकडे पाठवण्यात आली होती.
आपले आरोप आपल्याच अंगाशी येत असल्याचं पाहून कपिल शर्माने लगेच 'मी भ्रष्टाचाराबद्दल फक्त माझी चिंता व्यक्त केली. मी अशा काही भ्रष्ट लोकांचा सामना केला आहे. मी भाजप, शिवसेना आणि मनसे अशा कुठल्याही पक्षावर आरोप केलेला नाही', असे टि्वट केले होते.