ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 18 - मनसेने मल्टिप्लेक्स मालकांना 'ए दिल है मुश्किल' सिनेमा प्रदर्शित न करण्याची धमकी दिल्यानंतर सिनेमाचा निर्माता करण जोहरने मुंबई पोलिसांकडे धाव घेतली आहे. मुंबईच्या पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्याने सुरक्षा पुरवण्याची मागणी केली आहे. यावर पोलिसांनीही सुरक्षा पुरवण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडियाचे अध्यक्ष मुकेश भट्ट आणि फॉक्स स्टार इंडियाचे सीईओ विजय सिंह देखील उपस्थित होते. दिग्दर्शक-निर्माता करण जोहरचा सिनेमा 'ए दिल दै मुश्किल'मध्ये पाकिस्तानी कलाकार फवाद खान असल्याने सिनेमावर प्रदर्शनाची टांगती तलवार कायम आहे. याच पार्श्वभूमीवर, मनसेचे अमेय खोपकर यांनी सोमवारी (17 ऑक्टोबर) मल्टिप्लेक्स मालकांना 'ए दिल है मुश्किल' सिनेमा दाखवू नका, अन्यथा मनसे स्टाईलने उत्तर देऊ, मल्टिप्लेक्समधील काचा खूप महागड्या असतात, हे विसरू नका', अशी तंबी दिली होती.
आणखी बातम्या
'पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी आम्ही आलो नाही, आपण सर्व एक असून, आपल्यात फूट पडता कामा नये. मनसे हा माझा भाऊ आहे, मात्र माझ्या आणि त्यांच्या विचारांमध्ये फरक आहे, प्रत्येक घरात असे होतच असते. आपल्यामध्ये फूट पाडून युद्ध जिंकले, असे दहशतवाद्यांना वाटू नये यासाठी मी मनसेला आमच्यासोबत येण्याचे आवाहन करतो', मनसेने दिलेल्या धमकीवर मुकेश भट्ट यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, आताची तणावाची परिस्थिती पाहता पोलिसांनीही सुरक्षा पुरवण्याचे आश्वासन दिले आहे. 'मनसेकडून सिनेमागृहांना मिळालेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस पुरेशी आणि आवश्यक असल्यास सुरक्षा पुरवतील',असे पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी सांगितले आहे.
MNS is my brother, only with different thinking. I can only appeal to my brother to go on in peace: Mukesh Bhatt #AeDilHaiMushkilpic.twitter.com/3K763pDqeA— ANI (@ANI_news) October 18, 2016