ऑनलाइऩ लोकमत
वाशिम - करोडो रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणा-या ‘सैराट’ या मराठी चित्रपटातील अभिनेत्री ‘आर्ची’च्या भाषेतील संवाद आता हागणदारीमुक्तीच्या प्रचारासाठी कारंजा नगर पालिकेने वापरणे सुरू केले आहे. कारंजा शहरात ठिकठिकाणी फलक लावून ‘ये रताळ्या... अरं उठ की,’ या भाषेतून हागणदारीमुक्तीचा संदेश दिला जात आहे.
स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शहरी भागातही हगणदरीमुक्त शहर अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत नवनवीन प्रयोग व क्लृप्त्या वापरून प्रचार-प्रसिद्धी करण्याची चढाओढ स्थानिक स्वराज्य संस्थेत लागल्याचे दिसून येते. कारंजा नगर पालिकेने ‘सैराट’ चित्रपटातील अभिनेत्री आर्चीच्या भाषेतील संवादावर आधारित ‘म्हण’ तयार केली आहे. शहरात ठिकठिकाणी फलक लावून ‘ये रताळ्या... अरं उठ की, तुला कितीदा सांगितलं, उघड्यावर बसू नको. मराठीत सांगितलेलं कळतं नाही होय.. का इंग्लिश ... मध्ये सांगू ...! असा आशय लिहून उघड्यावर शौचास न जाण्याचा संदेश दिला जात आहे.