अतुल कुलकर्णी, मुंबईअमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही.झेड. गंधारे यांचे निलंबन रद्द करून त्यांना रुजू करून घेतल्यास त्यांच्याविरुद्ध चालू असलेल्या चौकशीवर विपरीत परिणाम होईल, या महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या पत्राला केराची टोपली दाखवत तंत्रशिक्षण संचालकांनी गंधारे यांना रुजू करून घेतले आहे. अधिक माहिती अशी- गंधारे यांच्याविषयी अनियमितता, गैरव्यवहाराचे आरोप होते. त्यासाठी डॉ. पी.एम. खोडके यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती. या समितीने १९ निष्कर्ष काढत गंधारे यांनी अपहार केल्याचे नमूद केले होते. त्यावर खडसे यांनी अशा स्थितीत गंधारे यांचे निलंबन मागे घेणे उचित होणार नाही, आधी त्यांच्यावर आरोपपत्र बजावून आरोपांची चौकशी पूर्ण होईपर्यंत गंधारे यांचे निलंबन कायम ठेवावे,असे पत्र खडसे यांनी मुख्यमंत्री, तंत्रशिक्षण मंत्री तावडे आणि संचालक तंत्रशिक्षण यांना दिले होते. मात्र खडसेंच्या पत्राला डावलून गंधारे यांना कामावर रुजू करून घेतले गेले आहे.विशेष म्हणजे खडसे यांनी १६ डिसेंबर, २३ डिसेंबर आणि १९ जानेवारी अशा तीन तारखांना तीन वेगवेगळी पत्रे देऊनही तावडे आणि संचालकांनी त्याची दखल घेतली नाही. १९ जानेवारीला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अधिकारी श्रेष्ठ की मंत्री, असा सवाल खडसे यांनी उपस्थित केला होता. तसाच अनुभव स्वत: खडसे यांनाही आला आहे.याबाबत तावडे यांच्याशी संपर्क साधला असता ते रायगड महोत्सवाला गेल्याचे सांगण्यात आले तर संचालकांना वारंवार संपर्क साधूनही ते प्रतिक्रियेसाठी उपलब्ध झाले नाहीत.
खडसेंच्या पत्राला केराची टोपली
By admin | Published: January 22, 2016 3:23 AM