नेरळ : कोरोना साथीच्या वावटळींनी दैनंदिन जीवन प्रभावित केलेच, तर अनेकांचे विवाहही खोळंबले. त्यातल्या काहींनी बँडबाजा, वरातीला बगल देत मोजक्याच वऱ्हाडींच्या उपस्थितीत कसेबसे आपले विवाह उरकून घेतले. अशात कर्जत तालुक्यातील एका नवरदेवाच्या लग्नाची गोष्ट चर्चेत आली आहे. परदेशात असलेल्या वधू आणि वराचे भारतात ठरलेले लग्न कोरोनाने वाट अडविल्याने त्यांनी अमेरिकेत पार पाडले. ऑनलाइन उपस्थिती लावत मुंबईतील वऱ्हाडी मंडळींनी अक्षता टाकून वधूवरांना आशीर्वाद दिले.
कर्जत तालुक्यातील वंजारवाडी येथील रहिवासी आणि मुंबईत पोलीस निरीक्षक पदावर रुजू असलेले अनिल थोरवे यांचा मुलगा अजय आणि त्याची केरळ येथील वर्गमैत्रीण श्रीनिधी श्रीनिवास राघवन यांचे सुमारे दीड वर्षापासून लग्न ठरले होते. अजय व श्रीनिधी या दोघांनी मुंबई विद्यापीठातून कॉम्प्युटर इंजिनीअरिंग केले असून, अमेरिकेतही उच्च शिक्षण घेतले आहे. दोघेही प्रसिद्ध कंपन्यांमध्ये उच्चपदावर कार्यरत आहेत.
कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर २ एप्रिल २०२० रोजी त्यांनी मुंबईत विवाह समारंभ पार पाडण्याचे ठरवले होते. त्यासाठी हॉटेलही बुक केले होते. मात्र कोरोनामुळे अमेरिकेहून विमानांची वाहतूक बंद झाल्याने त्यांचे लग्न १७ मे रोजी मुंबईत करण्याचे ठरले. त्या वेळीही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने विवाह सोहळ्याच्या दुसऱ्या नियोजनावर पाणी फिरविले. कोरोनामुळे लादलेल्या निर्बंधांनी वाट अडविल्याने दोघांना भारतात येणे अवघड झाले. म्हणून दोघांच्या कुटुंबीयांनी त्यांचे लग्न अमेरिकेतच करण्याचा निर्णय घेत भारतातून ऑनलाइन हजेरी लावण्याचे निश्चित केले. सिॲटल येथे १६ मे २०२१ रोजी सायंकाळी ६ वाजता दोघांच्या २० मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत नोंदणी पद्धतीने विवाह पार पडला. दोघांच्याही कुटुंबीयांना आनंद झाला असला तरीही त्यांच्या लग्नात प्रत्यक्ष उपस्थित राहू न शकल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.