कर्जत : कर्जत तालुक्यात गेल्या महिन्याभरातील लागोपाठ तिसर्यांदा वादळी पावसाने तडाखा दिला. मात्र यावेळी फार मोठ्या प्रमाणात नेरळपासून कळंब भागापर्यंत अनेक घरांचे नुकसान झाले, तर बारा घरांचे पूर्णपणे नुकसान झाले असून मोठ्या प्रमाणात किरकोळ नुकसान वादळाने केले. मानिवली ग्रामपंचायतमधील निकोप आणि मोहिली या गावांचा वीज पुरवठा करणारे रोहित्र जमिनीवर कोसळल्याने जळून गेले, तर या भागातील वीज पुरवठा करणारे तीस खांब वादळात कोसळले आहेत. अनेक ठिकाणी वीज वाहिन्यांवर झाडे उन्मळून पडल्याने रविवारी अर्धा तालुका अंधारात होता. रविवारी सहाच्या दरम्यान वादळ आले, हे वादळ प्रचंड वेगात सर्वत्र घोंगावत असल्याने मोठ्या प्रमाणात जुनी झाडे उन्मळून पडत होती. वादळ सुरु असताना लगेच पावसाने आपली हजेरी लावली. मात्र जवळपास तासभर वादळी वारा सुरु राहिल्याने नेरळपासून कळंब भागात मोठ्या प्रमाणात घरांचे छपर उडून गेल्याच्या घटना घडल्या. हा सर्व प्रकार सुरु असतांना अंधार पडला आणि वीज पुरवठा देखील खंडित झाल्याने रात्रभर रहिवाशांना अंधारात राहावे लागले. वादळी वार्याचा तडाखा कर्जत तालुक्यातील कशेळे भागापासून कळंब आणि नेरळ भागापासून शेलू आणि कळंब भागापर्यंत जाणवला. त्यामुळे रस्त्याच्या कडेने उभ्या असलेल्या वीज वाहिन्यांवर कोसळलेल्या झाडांमुळे रविवार रात्री अर्धा तालुका अंधारात होता . सर्वाधिक नुकसान शेलू ,निकोप, मोहिली, मानिवली ,बिरदोले ,पोशीर, वारे, कशेळे, सुगवे, कळंब, गीरेवाडी, अवसरे , वरई या गावांमध्ये झाले. या वादळामुळे अनेकांच्या घरांबरोबरच भाज्या आणि फळांच्या पिकांचेही मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. वादळग्रस्त भागाची पाहणी कर्जतचे तहसीलदार रवींद्र बाविस्कर यांनी केली. त्याआधी कळंबचे महसुल मंडळ अधिकारी तीरमले यांनी आपल्या सहकारी तलाठी यांच्यासह पंचनामे सुरु केले होते. वादळग्रस्त भागात मोठ्या प्रमाणात झाडे रस्त्यावर उन्मळून पडली आहेत. त्यामुळे रविवारी रात्री काही काळ नेरळ - कळंब रस्ता बंद होता. तो रस्ता नेरळ पोलिसांनी ग्रामस्थांची मदत घेवून सुरु केला तर वादळाने वीज पुरवठा करणारे खांब कोसळले असल्याने वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न महावितरण करीत आहे. सहायक अभियंता पी. पी. गुल्हने हे सर्व टीमसह कोसळलेले तीस खांब पुन्हा उभे करण्याचा प्रयत्न करीत आहेत. निकोप आणि मोहिली यांना वीज पुरवठा करणारे वीज रोहित्र जळून गेल्याने तेथील ग्रामस्थांना काही दिवस अंधारात राहावे लागणर आहे. कर्जत तालुक्यात लागोपाठ तिसर्यांदा वादळी वार्यासह आलेल्या पावसाने झोडपून काढले आहे. (वार्ताहर)
कळंबला वादळाचा तडाखा
By admin | Published: May 20, 2014 12:55 AM