- पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप; विश्वकोष निर्मिती मंडळावरील नियुक्ती वादात
मुंबई - मराठी भाषा विभागाचे मंत्री विनोद तावडे यांच्याशी असलेल्या व्यावसायिक संबंधांमुळेच दिलीप करंबळेकर यांची महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोष निर्मिती मंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली.चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोष निर्मिती मंडळाच्या अध्यक्ष पदासाठी ४ तर सदस्य पदासाठी २४ नावे प्रस्तावीत होती. प्रस्तावीत नावांमध्ये करंबळेकरांचा समावेश नव्हता. तरीही संबंधित मराठी भाषा विभागाचे मंत्री म्हणून तावडेंनी त्यांचे व्यावसायिक भागीदार असलेल्या करंबळेकरांना थेट अध्यक्षपदाने लाभान्वीत केले. संबंधित शासकीय नस्तीमध्ये तावडे यांच्या विशेष कार्य अधिकाऱ्याच्या निदेशावरून ऐनवेळी दिलीप करंबळेकर यांचे नाव प्रस्तावीत केल्याचे शासनाच्या उपसचिवांनी स्पष्टपणे नमूद केले आहे. यावरून ही नियुक्ती करताना मंत्री तावडे यांनी आपल्या व्यावसायिक भागिदाराचे हित जपल्याचे दिसून येते.मंत्री तावडे आणि करंबळेकर हे श्री मल्टीमीडिया व्हीजन लिमिटेड या कंपनीत आजतागायत संचालक आहेत. तत्पूर्वी हे दोघेही १९९६ ते २००७ दरम्यान श्रीरंग प्रिंटर्स प्रा. लि. या कंपनीचे भागिदार होते. तावडे यांनी ते श्री मल्टीमीडिया व्हीजन लिमिटेड या कंपनीत संचालक असल्याची माहिती २०१४ मधील विधान परिषद निवडणूक आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतीज्ञापत्रातून दडवून ठेवल्याचा आरोप करत मुख्यमंत्र्यांनी तावडे यांचा राजीनामा घ्यावा व करंबळेकर यांना बडतर्फ करावे, अशी मागणी चव्हाण यांनी केली. याच कंपनीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेही समभाग आहेत.त्यामुळे गडकरी यांनीही राजीनामा दिला पाहिजे, असे चव्हाण म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)
मी तर मानद संचालक - तावडेश्री मल्टीमिडिया व्हिजन लिमिटेड या कंपनीत आपण केवळ मानद संचालक असून आपल्याला कोणतेही वेतन मिळत नाही किंवा कोणताही आर्थिक लाभ मिळत नाही. आर्थिक गुंतवणूक असेल तरच निवडणूकीच्या अर्जासोबतच्या प्रतिज्ञापत्रात त्याचा उल्लेख करावा लागतो, त्यामुळे या कंपनीविषयीचा उल्लेख करण्याची गरज नव्हती, असा खुलासा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केला.विश्वकोष मंडळाचे अध्यक्ष करंबळेकर यांनी साप्ताहिक विवेकचे संपादक म्हणून आणि चरित्रकोषाचे संपादक म्हणून उत्तम काम केले आहे. त्यांच्या क्षमतेच्या आधारावर त्यांच्या नियुक्तीचा निर्णय घेतलेला आह, असेही तावडे म्हणाले.