'ऑपरेशन लोटस' तोडाफोडीचं राजकारण जनतेला मान्य नाही; काँग्रेसचा भाजपाला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2023 12:20 PM2023-05-13T12:20:01+5:302023-05-13T12:20:48+5:30
आगामी काळात होणाऱ्या लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत भाजपच्या घसरणीला आता सुरुवात झाली आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेत्यांनी दिली आहे.
मुंबई - कर्नाटक निवडणुकीच्या निकालाचे पडसाद आता विविध राज्यात उमटू लागले आहेत. काँग्रेसला मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. कर्नाटकच्या विजयाचा आनंद कार्यकर्ते साजरा करत आहेत. तर या निवडणुकीच्या निकालावरून भाजपाचं ऑपरेशन लोटस, तोडफोडीचे राजकारण जनतेला मान्य नाही असा टोला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी भाजपाला लगावला आहे.
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, प्राथमिक कलांमध्ये काँग्रेस आघाडीवर असून देशाची इच्छा आहे की काँग्रेसचा विजय व्हावा. ऑपरेशन लोटस तोडाफोडीचं राजकारण जनतेला मान्य नाही, हे या निकालावरून समोर आलंय. भविष्याच्या राजकारणात लोकशाही टिकवायची असेल तर कर्नाटकचा आजचा निकाल खूप महत्त्वाचा आहे असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत आगामी काळात होणाऱ्या लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत भाजपच्या घसरणीला आता सुरुवात झाली आहे. लोकशाही वाचवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना पाठिंबा मिळतोय हेच यावरून स्पष्ट होतं. भारत जोडो यात्रा ही ऐतिहासिक घटना असून भारत जोडो यात्रेचा प्रभाव कर्नाटक निवडणुकीत निश्चितपणे दिसला असा विश्वास काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
भाजपानं धडा घेतला पाहिजे
दरम्यान, लिंगायत समाजाच्या जोरावर निवडून आले त्यांना वाळीत टाकण्याचे काम भाजपने केले. त्यामुळे कर्नाटकच्या जनतेने भाजपाला वाळीत टाकले. भाजपाने धडा शिकला पाहिजे की सत्तेचा दुरुपयोग करुन जनता घाबरणार नाही. कर्नाटकात १२४ च्या वर जागा सुशिक्षित मतदारांनी कॉंग्रेसला दिल्या आहेत. याहूनही जास्त जागा येतील. राहुल गांधीवर खोटा आरोप लावून त्यांचे लोकसभेचं सदस्यत्व रद्द करण्याचं पाप भाजपने करत त्यांना बेघर केलं. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला मानण्याची देशात सुरुवात झाली आहे. राहुल गांधीकडे आम्ही पंतप्रधान म्हणून पाहतोय, राहुल गांधी शिकलेले आहेत आताचे पंतप्रधान किती शिकले मला माहित नाही असं सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी भाजपावर तोंडसुख घेतले.