महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आता दिवसेंदिवस चिघळत असल्याचं दिसून येत आहे. बेळगाव-हिरेबागवाडी येथील टोल नाक्यावर महाराष्ट्र पासिंगच्या ट्रकवर कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला होता. या घटनेनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
“या विषयावर महाराष्ट्र जर पेटला तर या सरकारला भारी पडेल. कर्नाटकाचं नंतर पाहू. डोळे मिटून बसलायत, स्वाभिमान, अस्मिता, महाराष्ट्राचा अभिमान, आपल्या लोकांविषयी प्रेम आहे का? की सर्व खोक्यात वाहून गेलं?” असा सवाल राऊत यांनी केला. माध्यमांशी बोलताना राऊत यांनी सरकारवर टीकेचा बाण सोडला.
“पुण्यात पडसाद उमटलेत. महाराष्ट्रासाठी लढणाऱ्या शिवसैनिकांना शिंदे फडणवीस सरकारचे पोलीस लाठ्याकाठ्यांनी बदडतायत, कोल्हापुरातही तेच झालं. तुम्ही कोणाचं काम करताय? तुमच्या अंगात जर मराठी रक्त असेल तर शिवसैनिकांना रोखू नका असं माझं महाराष्ट्र पोलिसांना आवाहन आहे,” असंही ते म्हणाले. “सरकार काय करतंय? मुख्यमंत्री कुठे आहेत? आम्ही त्या काळात बेळगावात जाऊन लाठ्या काठ्या खाल्ल्यात असं ते सांगतात. कधी खाल्ल्यात? सीमाप्रश्नासाठी लाठीकाठी खाल्ली असती तर आज ज्या खुर्चीवर तुम्ही बसले आहात त्या खुर्चीवरून कर्नाटकनं केलेला पाहिला नसता. आमच्या सार्वजनिक संपत्तीचं नुकसान कर्नाटकात केलं जातंय. तुम्ही कुठे भूमिगत झालायत?” असा सवालही त्यांनी केला.
“राज्यात कमकुवत सरकार”“राज्यात अत्यंत दुर्बळ, लाचार, कमकुवत सरकार आहे. या सरकारला पाय नसून खोके आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचं पाणी रोखण्याचं काम कर्नाटकात झालं. यापूर्वीही झालं. त्याला शिवसेनेने चोख उत्तर दिलंय. आजही शिवसेना त्याला प्रत्युत्तर देतेय,” असंही राऊत यांनी नमूद केलं. उद्धव ठाकरेही आज बोलले, आम्ही याधीही गेलोय, यापुढेही जाऊ. बेळगाव, कारवार महाराष्ट्राचा भाग आहे, आमच्या बापाचा आहे. आम्ही शेवटपर्यंत लढत राहू असंही त्यांनी स्पष्ट केलं.