Siddaramaiah In Sangli Maharashtra: भारतीय जनता पक्ष जाती-जातीत, धर्मा-धर्मात वाद घडवून सामाजिक शांतता भंग करत आहे तसेच संघ परिवाराचे लोकही धर्मा-धर्मात वाद लावून दंगे घडवतात आणि त्यात सामान्य जनता मात्र भरडली जात आहे. भारतीय जनता पक्ष म्हणजे भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार म्हणजे भाजपा असे समीकरण आहे. कर्नाटकात ४० टक्के कमिशन दिल्याशिवाय कोणतेच काम होत नव्हते. कर्नाटकच्या जनतेने भ्रष्टाचारी भाजपाला घरी बसवले, महाराष्ट्रातही शिंदे-फडणवीस सरकार अत्यंत भ्रष्ट आहे, हे भ्रष्ट सरकारही उखडून टाका व काँग्रेसची सत्ता आणा, असे आवाहन कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले.
सांगली येथील कल्पद्रुम क्रीडांगण मैदानावर महानिर्धार २०२४ शेतकरी संवाद व कार्यकर्ता मेळावा झाला. या मेळाव्यात सिद्धरामय्या बोलत होते. ते पुढे म्हणाले की, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहु महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिशा दिली. डॉ. बाबासाहेबांचे संविधान नसते तर दिनदलित, शोषित, वंचित वर्ग मुख्य प्रवाहात आला नसता, त्याला समान हक्क मिळाले नसते. जातीयवादी भाजपा सरकार मात्र घटनाच बदलण्याची भाषा करत आहे. गोलवलकर, सावरकर यांनी संविधान अस्तित्वात आल्यापासूनच विरोध केला आहे आणि आताही या विचाराचे लोक संविधानाला विरोधच करत आहेत. संविधान राहिले तरच आपले अस्तित्व राहिल म्हणून संविधानाच्या रक्षणासाठी कोणताही त्याग व बलिदान देण्याची तयारी ठेवा, असे त्यांनी सांगितले.
कोट्यवधी रुपयांचे आमिष दाखवून भाजपा सत्ता स्थापन करते
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने २२४ पैकी १३६ जागांवर विजयी मिळवला. कर्नाटकात भाजप जनतेच्या आशिर्वादाने सत्तेत येत नाही, ते ऑपरेशन कमळ करुन आमदार विकत घेऊन सत्तेत आले होते. कोट्यवधी रुपयांचे आमिष दाखवून भाजपा सत्ता स्थापन करते. काँग्रेसने कर्नाटकात भाजपाचा भ्रष्टाचार घराघरात पोहचवला व भाजपमुक्त कर्नाटक केले. सरकार स्थापन होताच जनतेल्या दिलेल्या ५ आश्वासनांवर २४ तासात निर्णय घेतला, असे सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे.
दरम्यान, सांगलीतील मेळाव्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते माजी मंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, कर्नाटकचे मंत्री एम. बी. पाटील, आ. प्रणिती शिंदे, या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष माजी मंत्री आ. डॉ. विश्वजीत कदम यांच्यासह राज्यातील काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते.