कोल्हापूर : कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील पूरग्रस्त भागांत मी अनेक ठिकाणी फिरलो. तिथे सरकारकडून वेळेत मदत मिळाली नसल्याच्या तक्रारी लोकांनी माझ्याजवळ केल्या. परंतु त्याबद्दल काही मत व्यक्त करून मला त्या वादात पडायचे नाही. पूरग्रस्त जनतेचे अश्रू पुसणे व त्यांना जीवनात नव्याने उभा करण्यासाठी प्रयत्न यालाच आमचे प्राधान्य असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. महाराष्ट्रापेक्षा कर्नाटक सरकारकडून पूरग्रस्तांना सुलभ व जास्त मदत मिळत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. महापुरामुळे विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी योग्य नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.महापुराच्या संकटात राज्य सरकार लोकांच्या मदतीसाठी धावून जाण्यात कमी पडल्याच्या लोकांच्या तक्रारी आहेत, त्याबद्दल तुमचा अनुभव काय, अशी थेट विचारणा पवार यांना करण्यात आली होती. त्यावर ते म्हणाले, महाराष्ट्राच्या अर्थकारणांमध्ये मोठे योगदान देणारे हे जिल्हे आहेत. राज्य सरकार मदत देताना शहरी व ग्रामीण असा दुजाभाव करत आहे, तो योग्य नाही. शहरी माणसांला रोख ७५०० आणि ग्रामीण जनतेला ५००० हजार असा निकष आहे. त्यातही दोन दिवस पाण्यात घर राहिल्याचा निकषही गैरलागू आहे.महाराष्ट्र व कर्नाटक सरकारच्या मदत देण्यातही फरक आहे. राज्य सरकारने केंद्राकडे ६,८०० कोटी रुपयांची मदत मागितली आहे. महापुराचे संकट पाहता ही रक्कम पुरेशी नाही. परंतु केंद्रात व राज्यात एकाच पक्षाचे सरकार असल्यामुळे ही सर्व मदत मिळेल अशी आशा करूया.
पूरग्रस्तांसाठी महाराष्ट्रापेक्षा कर्नाटक सरकारची मदत जास्त : शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 5:48 AM