मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत. बेळगाव येथे महाराष्ट्रातील वाहनांवर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला आहे. या घटनेनंतर महाराष्ट्रातून संताप व्यक्त होत आहे. यावरुन महाराष्ट्रात वातावरण तापले आहे. यानंतर राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungatiwar) यांनी थेट कर्नाटक सरकारला इशारा दिला आहे.
जे समाज कंटक, जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत, जे नादान आहेत. बेळगावमध्ये समाज कंटकाकडून अशाप्रकारे घातपात करण्यात येईल, तर कर्नाटक सरकारला याची गंभीर दखल घ्यावी लागेल. अशा लोकांना शिक्षा झाली पाहिजे. जर कोणी गुंडाने महाराष्ट्राशी गुंडगिरी करण्याचा प्रयत्न केला तर हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, हे कर्नाटकने लक्षात ठेवावे आणि अशा लोकांना आम्ही नक्कीच धडा शिकवू शकतो, असा इशारा सुधीर मुनगंटीवार यांनी दिला आहे. याचबरोबर, महाराष्ट्रातील वाहनांवर कर्नाटकात हल्ला करण्यात आल्यानंतर कर्नाटक सरकारने अशा गुंडांवर ताबडतोब कारवाई करावी आणि जे जाळपोळ करतात, त्यांना तुरुंगात टाकावे, असे देखील सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
तसेच, महाराष्ट्र-कर्नाटक सीमेचे प्रश्न तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जन्माला घातले, प्रांत निर्मितीसाठी आयोग स्थापन झाला तेव्हा पंडित नेहरूंनी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांच्या आवाजाचा आदर केला नाही आणि त्याचे परिणाम आज महाराष्ट्रातील जनता, मराठी जनता भोगत आहे, अशी टीका सुद्धा सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत सीमाभागात घडलेल्या काही घडामोडी आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या प्रक्षोभक विधानांमुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमावाद आता दिवसेंदिवस चिघळत असल्याचे दिसून येत आहे.