Maharashtra-Karnataka Bus Services Row: बेगळावात एका अल्पवयीन मुलीला शिवीगाळ केल्याप्रकरणी कानडी कंडक्टरला मारहाण केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. कर्नाटकच्या कंडक्टरने आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप अल्पवयीन मुलीने केला होता. त्यानंतर काही लोकांनी बस थांबवून या कंडक्टरला मारहाण केली. त्यानंतर कंडक्टरविरोधात पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र आपल्याला मराठी बोलता येत नसल्याने मारहाण केल्याचा आरोप कंडक्टरने केला. त्यानंतर याचे पडसाद महाराष्ट्रकर्नाटकातील परिवहन मंडळांच्या बसवर उमटले. त्यानंतर आता महाराष्ट्र आणि कर्नाटक दरम्यानची बससेवा यावेळी ठप्प झाली आहे. अशातच आता मुलीच्या कुटुंबियांनी कंडक्टरविरोधातील तक्रार मागे घेणार असल्याचे म्हटलं आहे.
कानडी कंडक्टरला झालेल्या मारहाणीनंतर कर्नाटक आणि महाराष्ट्रातील वादाने जोर पकडला आहे. यामुळे दोन्ही राज्यांमधील बससेवा ठप्प झाली आहे. दोन्ही राज्ये एकमेकांच्या राज्यात बस पाठवत नाहीयेत. अल्पवयीन मुलीला मुलीला कंडक्टरने कन्नड भाषेत बोलण्यास सांगितले होते. त्यानंतर हे प्रकरण वाढलं आणि कंडक्टरला मारहाण करण्यात आली. याचा परिणाम दोन्ही राज्यातील बससेवेवर झाला. या विरोधादरम्यान आता या मुलीच्या कुटुंबियांनी यू-टर्न घेतला आहे. मुलीच्या तक्रारीवरून कर्नाटक बस कंडक्टरविरुद्ध लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र आता मुलीच्या कुटुंबीयांनी एक व्हिडिओ जारी करत गुन्हा मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. तसेच हे प्रकरण वाढवू नये अशीही विनंती केली.
बेळगावच्या मारहाळ गावाच्या आसपास बसमध्ये तिकीटाच्या वादातून बस कंडक्टर महादेवप्पा मल्लाप्पा हुक्केरी यांच्याविरुद्ध लैंगिक छळाची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर मुलीने मंगळवारी तक्रार मागे घेण्याची मागणी केली. हा वाद मिटवण्यासाठी मुलीच्या पालकांनी, आम्हालाही कन्नड भाषेविषयी जिव्हाळा आहे, कन्नडच्या कोणताही भेदभाव नाही. कन्नड आणि मराठीच्या नावाने विनाकारण अपप्रचार केला जात आहे, असं म्हटलं. तसेच या मुद्द्यामुळे कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये तेढ निर्माण झाली आहे, आमच्याकडे कन्नड किंवा मराठी असा भेदभाव नाही. याचा आम्हाला त्रास आहे. आम्हीसुद्धा कन्नड आहोत, आमची भाषा मराठी असू शकते, असंही कुटुंबाने म्हटलं.
कुटुंबाने म्हटलं की आम्ही स्वेच्छेने खटला मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे आणि सर्वांना विनंती करतो त्यांनी हे प्रकरण आणखी वाढवू नये. "आमच्या मुलीवर अन्याय झाला आहे पण परिस्थिती पाहता आम्ही खटला मागे घेऊ. आम्ही हे सर्व थांबवण्याची विनंती करतो. खटला मागे घेण्यासाठी कोणाचाही दबाव नाही, स्वेच्छेने आम्ही खटला मागे घेत आहोत," असे कुटुंबाने म्हटलं.
दरम्यान, बस कंडक्टरविरुद्धचा पॉक्सो खटला मागे घेण्याच्या मागणीवर बेळगावचे पोलिसांनी आमच्याशी कोणीही संपर्क साधला नसल्याचे म्हटलं. "आम्हाला सोशल मीडियावरुन मुलीच्या कुटुंबाने केस मागे घेण्याची इच्छा व्यक्त केल्याचे कळलं. पण त्यांनी अद्याप या संदर्भात पोलिसांशी संपर्क साधलेला नाही. त्यांना पोलीस ठाण्यात अधिकृतपणे जबाब नोंदवावा लागेल. मग केस बंद करण्यासाठी काही प्रक्रियांचे पालन करावे लागेल. त्यानुसार, आम्ही त्यांचे जबाब नोंदवल्यानंतर पुढील कारवाई होईल," अशी माहिती बेळगाव पोलिसांनी दिली.