NCP vs Eknath Shinde, Karnataka - Maharashtra Disputes: कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काही दिवसांपूर्वी बंगळुरुमध्ये एका कार्यक्रमात जत तालुक्यातील गावावरुन धक्कादायक वक्तव्य केले होते. जत तालुक्यातील ४० गावांवर दावा करण्याच्या तयारीत आम्ही आहोत, असा दावा मुख्यमंत्री बोम्मई यांनी केला होता. यावरुन आरोप-प्रत्यारोप अद्यापही सुरूच आहेत. यावर, महाराष्ट्रातून एकही गाव बाहेर जाणार नाही ही जबाबदारी आमची आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. त्यानंतर आता सीमेवरील मतभेद पाहता परिस्थिती अनुकूल नाही असं सांगून, महाराष्ट्रातील मंत्र्यांनी बेळगावला येऊ नये, असे सांगितले जात आहे. यावरून राष्ट्रवादीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सवाल विचारला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो (Clyde Crasto) म्हणाले, "कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेबाबत केलेल्या बेताल वक्तव्यावर आणि उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर केंद्र सरकार, भाजप आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मौन का बाळगून आहेत? सर्वप्रथम त्यांनी न्यायालयाधीन सीमा मुद्द्यांवर विधाने केली, ज्यामुळे दोन्ही राज्यांतील शांतता बिघडली. आता सीमेवरील मतभेद पाहता परिस्थिती अनुकूल नाही असं सांगून, महाराष्ट्रातील मंत्र्यांनी बेळगावला येऊ नये, असे त्यांचे म्हणणे आहे. बोम्मई यांच्या बेताल विधानांमुळे मतभेद पुन्हा वाढले आहेत."
"मंत्री या वादावर कायदेतज्ज्ञ आणि इतर लोकांशी संपर्क साधणार होते. सीमाप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी चर्चेने मदत होऊ शकते, मग कर्नाटकचे मुख्यमंत्री संवादासाठी तयार का नाहीत? बोम्मई यांना त्यांच्या अटींवर हुकूमशाही करण्याची परवानगी दिली जाऊ नये. म्हणून केंद्राने हस्तक्षेप करून त्यांना रोखणे आणि दोन्ही राज्यांमध्ये शांतता राखणे आवश्यक आहे. आता हा प्रश्न की, बोम्मई बेताल बोलत असताना केंद्र, भाजप आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी का मौन धारण केले आहे? याचे उत्तर महाराष्ट्र आणि कर्नाटकातील जनतेला केंद्र सरकार, भाजप आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी देणे आवश्यक आहे," असा सवालही क्लाईड क्रास्टो यांनी उपस्थित केला आहे.