मुंबई - बंडखोरी करून भाजपला साथ देणाऱ्या आमदारांचे सदस्यत्व रद्द केल्यानंतर कर्नाटकमध्ये 15 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा वरचष्मा राहिला. 15 पैकी 12 जागांवर भाजपने बाजी मारून राज्यातील सरकार कायम ठेवले आहे. त्याचवेळी कर्नाटकमध्ये जनतेने बंडखोरी करणाऱ्यांवर पुन्हा एकदा विश्वास दाखवल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील काठावर असलेल्या आमदारांना हा निकाल प्रोत्साहित करणार ठरणार आहे.
भारतीय जनता पक्ष राज्यातील गेलेली सत्ता परत मिळविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. त्यातच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या एका लग्नातील भेटीने चर्चांना उधाण आले होते. तर सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा गोड बातमीचा उल्लेख केल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. भाजपला अजुनही सत्ताधारी पक्षातील आमदार फुटीची प्रतीक्षा असल्याचे यातून सूचित होत आहे.
निवडणुकीच्या निकालानंतर अनेक आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला होता. ते इच्छूक आमदार कोण आहेत, हे स्पष्ट झाले नाही. मात्र बंडखोरी करून किंवा पोटनिवडणूक जिंकूनही भाजपला साथ देणे शक्य असल्याचे वातावरण कर्नाटकच्या निकालावरून समोर आले आहे. हा निकाल काठावर असलेल्या आमदारांना बंडखोरीसाठी प्रोत्साहन देणार आहे.
एकूणच कर्नाटकचा निकाल हा राजीनामा देऊन भाजपसोबत जाण्याची तयारी ठेवणाऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतो. त्यासाठी आमदारांना मोठा निर्णय घेण्याचे धारिष्ठ दाखवावे लागणार आहे.