पुणे/सोलापूर/ नाशिक : कर्नाटकमध्ये मुस्लीम मुलींना महाविद्यालयात बुरखा घालून येण्यास मनाई करण्याच्या प्रकाराचे गुरुवारी राज्यात पडसाद उमटले. पुण्यात हिजाबच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केले, तर दुसरीकडे हिंदू महासंघातर्फे भगवे उपरणे घालून मिरवणूक काढण्यात आली होती.राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने समता भूमी, महात्मा फुलेवाडा येथे निषेध आंदोलन करण्यात आले. पंजाबी, गुजराती, आसामी, केरळी, महाराष्ट्रीय व हिजाब परिधान केलेल्या अनेक महिला भगिनींनी यात सहभाग घेतला. हिजाबला विरोध म्हणून हिंदू महासंघातर्फे भगवे उपरणे घालून कसबा गणपतीसमोरून मिरवणूक काढली. मालेगाव येथील अजीज कल्लू मैदानावर हिजाबधारी महिलांनी एकत्र येत मेळावा घेतला. प्रत्येक महिलेला धर्म व पंथानुसार राहणीमानाचे स्वातंत्र्य आहे. मुस्लीम समाजात हिजाब आणि पडदा पाळण्याचा कायदेशीर हक्क मिळाला असून, महिलांनी स्वत:च्या संरक्षणासाठी आपले आयुष्य पडदा पद्धतीत व्यतीत करावे, असे आवाहन मालेगावमध्ये जमियत उलेमाचे अध्यक्ष आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी केले.सोलापूरमध्ये हिजाब बंदीविरुद्ध काही महिलांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चाैकात आंदाेलन केले. काही तरुणींनी बाबासाहेबांच्या पुतळ्यासमाेर निवेदन ठेवले. हात जाेडून शांततेची प्रार्थना केली. पुतळ्यासमोर नतमस्तक होत महिलांच्या कायदेशीर धार्मिक अधिकारांची पायमल्ली होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. हिजाब बंदीविरोधात सोलापुरातील महिलांनी गुरुवारी हिजाब घालून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निषेधाचे निवेदन ठेवले व ‘जय श्रीराम, अल्ला हू अकबर’च्या घोषणा देऊन न्याय मागितला.
कर्नाटकच्या हिजाब प्रकरणाचे राज्यात पडसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 1:25 PM