गजानन कलोरे/शेगाव (बुलडाणा) : ह्यधन्य आज दिन संत दर्शनाचा, मज वाटे त्याशी आलिंगण द्यावे, गजानन अवलिया अवतरले जग तारायाह्ण या अभंग व भजन गायनाने शेगावातील वातावरण कार्तिक एकादशीनिमित्ताने भक्तीमय झाले होते. दीड लाखाचेवर भाविकांनी शेगावात हजेरी लावून श्री संत गजानन महाराज समाधीचे दर्शन घेतले. एकादशी सोहळ्याला श्री क्षेत्र पंढरपूरनंतर शेगावात लाखो भाविकांची मांदियाळी होते. कार्तिक शुध्द एकादशी, रविवार २२ नोव्हेंबर रोजी संस्थानच्या प्रांगणातून श्री गजानन महाराजांची पालखी दुपारी २ वाजता हत्ती, घोडे, रथ, मेणा, टाळकरी, वारकरी आदी राजवैभवी थाटात नगर परिक्रमेसाठी निघाली. सुरुवातीला संस्थानचे कार्यकारी विश्वस्त नीळकंठदादा पाटील यांनी श्रींच्या रजत मुखवट्याची विधीवत पूजा केली व टाळमृदंगाच्या निनादात, हरिनामाच्या गजरात, श्रींची पालखी परिक्रमेसाठी मार्गस्थ झाली. याप्रसंगी संस्थानचे विश्वस्त नारायणराव पाटील, पंकज शितूत, गोविंदराव कलोरे, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे शरद शिंदे, मधूकर घाटोळ, रामेश्वर काठोळे आदी मान्यवर उपस्थित होते. ह्यश्रीह्णच्या पालखीचे श्री महादेव मंदिर, श्री प्रगटस्थळ, श्री मारोती मंदिर या ठिकाणी संस्थानचे कार्यकारी विश्वस्त नीळकंठदादा पाटील व विश्वस्त गोविंदराव कलोरे यांच्या हस्ते विधीवत पूजन झाले. संस्थानच्यावतीने सुमारे एक लाखाचेवर भाविकांना उपवासाचा महाप्रसाद देण्यात आला. श्रींच्या पालखी समवेत सजलेला गज, ध्वजधारण केलेले अश्वस्वार, श्रींचा मेणा व श्री विठ्ठलाचे तैलचित्र असलेला रथ अशा राजवैभवी थाटात निघालेली नगर परिक्रमा डोळ्याचे पारणे फेडणारी होती. हजारो भाविक या नगरपरिक्रमेमध्ये सहभागी झाले होते. जे भाविक कार्तिक एकादशी वारीला श्री क्षेत्र पंढरपूरला जावू शकत नाहीत, ते भाविक शेगावात श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनाने कृतार्थ होतात आणि पंढरीची वारी पूर्ण करतात. श्री गजानन महाराजांनी भक्त बापूना काळे यांना साक्षात श्री विठ्ठल रुपात दर्शन दिले होते. त्यास्तव भाविक श्री गजानन महाराजांना विठ्ठलाचे रुप मानतात.
कार्तिकी एकादशी सोहळ्याला शेगावात लाखो भाविकांची मांदियाळी
By admin | Published: November 23, 2015 2:11 AM