पंढरपूर - कार्तिकी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा १२ नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे. कार्तिकी यात्रेत येणाऱ्या शेकडो दिंड्यांना वास्तव्यासाठी भक्तिसागर (६५ एकर) येथे जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. येथे मोफत प्लॉट्स भाविकांना तंबू, राहुट्या उभारून वास्तव्य करण्यासाठी देण्यात येत आहेत. प्रथम येणाऱ्या पालखी, दिंडीधारकांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. यासाठी ६ नोव्हेंबरपासून प्लॉट नोंदणी सुरू करण्यात येणार असून, आगाऊ प्लॉटची मागणी नोंदवावी, असे आवाहन प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी केले आहे.
कार्तिकी यात्रेला येणाऱ्या पालख्या, दिंड्यांमधील भाविकांना निवाऱ्यासोबत पिण्याचे शुद्ध पाणी, शौचालय, वीज कनेक्शन, अन्नपदार्थ शिजवण्यासाठी गॅस वितरण, पोलिस संरक्षण, प्रथमोपचार केंद्र आदी सुविधा दिल्या जातात. या ठिकाणी एकूण ४९७ प्लॉट्स असून, त्यापैकी वापरायोग्य ४५० प्लॉट्स आहेत. हे प्लॉट्स भाविकांना निवाऱ्यासाठी दिले जातात. या ठिकाणी भाविकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आपत्कालीन मदत केंद्र स्थापन करण्यात येते. येथे प्रशासकीय यंत्रणा सुसज्ज व सुरळीतपणे काम करण्यासाठी नायब तहसीलदार सुधाकर धाईंजे यांची सेक्टर मॅनेजर म्हणून नियुक्ती केली आहे.
विठ्ठल-रूक्मिणी मातेचे २४ तास दर्शनपंढरपूर : दरवर्षी कार्तिकी यात्रेला भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता, यात्रा कालावधीत चांगला मुहूर्त व दिवस पाहून ‘श्रीं’ चा पलंग काढून भाविकांना २४ तास दर्शन उपलब्ध करून देण्यात येते.यावर्षी दि. ४ नोव्हेंबरला चांगला दिवस असल्याने विधिवत पूजा करून सकाळी श्रीं चा पलंग काढण्यात आला. विठ्ठलाच्या मूर्तीच्या पाठीशी लोड तर रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या पाठीशी तक्क्या देण्यात आला.त्यामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे २४ तास मुखदर्शन, तर २२.१५ तास पदस्पर्श दर्शन सुरू राहणार असल्याचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितले. २० नोव्हेंबर (प्रक्षाळ पूजा) पर्यंत २४ तास दर्शन उपलब्ध राहील.
येथे करावी प्लॉटची नोंदणी... भाविकांना भक्तिसागर येथे प्लॉट वाटप करण्यात प्रथम येणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.यासाठी नायब तहसीलदार सुधाकर धाईंजे (मो. ९७६७२४८२१०), सहायक बी. ए. वागज (मो. ७७५६०१२५७८), प्रमोद खंडागळे (मो. ९६५७२९०४०३) यांच्याकडे संपर्क साधावा.