मुंबई: राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर करुणा मुंडे यांनी पुन्हा एकदा गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. करुणा मुंडे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी राज्यातील महिलांवरील अत्याचारावर भाष्य केले. यावेळी त्यांनी मुंडेंनाही टार्गेट केले. यावेळेस त्यांनी अनेक खुलासेही केले.
करुणा मुंडे म्हणाल्या की, 'मी आजपर्यंत अनेक तक्रारी केल्या आहेत. गेल्या वर्षी धनंजय मुडेंनी माझी मुले उचलून नेली होती. माझ्यावर घटस्फोटाच्या कागदपत्रांवर साईन करुन, लिव्ह इनमध्ये राहत असल्याचे सांग, असा दबाव टाकला होता. मला 50 कोटींची ऑफर दिली, नंतर माझी मुले उचलून नेली. तेव्हाही मी महिला आयोगात तक्रार दिली होती, रुपाली चाकणकर यांनी काहीच कारवाई केली नाही. मी परळीला पत्रकार परिषद घेण्यासाठी गेल्यावर माझ्या गाडीत बंदूक ठेवली. महाविकास आघाडी सरकारने तेव्हाही काहीच कारवाई केली नाही. ते सरकार आपल्या मंत्र्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते.'
त्या पुढे म्हणाल्या की, 'आज सुप्रिया सुळेंवर वक्तव्य केल्यामुळे यांचा महिला सन्मान जागा झाला आहे. त्या वक्तव्याचा मी निषेध करते, महिलांवर अशी वक्तव्य कोणीच केली नाही पाहिजे. पण, मला दोन-दोन महिने तुरुंगात टाकले, तेव्हा कुठे गेला होता महिला सन्मान. धनंजय मुंडेला वाटतं की, मी घाबरेल. पण, मी घाबरणारी नाही. माझी गाडी उचलून नेली, माझ्या घरावर आता नजर आहे. तुला जे करायचं ते कर, तुझ्यात ताकत असेल, तर मीडियासमोर कागदपत्रे घेऊन ये, मी साईन करायला तयार आहे,' असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
'माझे घाणेरडे व्हिडिओ बनवून व्हायरल केले जात आहेत. माझ्या मुलांनाही घाण-घाण धमक्या देतो. माझे आवाहन आहे, माझी आणि धनंजय मुंडेंची नार्कोटेस्ट करावी. माझी कोणासोबतच दुष्मनी नाही. त्यामुळे, मला, माझ्या मुलांना, माझ्या भावाला, वहिनीला आणि पीएला काही झालं....आम्हाला ब्रेन हॅमरेज आला, हार्ट अटॅक आला, अपघात झाला किंवा विषबाधा झाली. या सगळ्यासाठी जबाबदार व्यक्ती धनंजय मुंडे असेल. मी पोलिसांसह नरेंद्र मोदी आणि कोर्टातही अर्ज दिलेला आहे. मला आणि माझ्या मुलांना काहीही झालं, तर याला सर्वस्वी धनंजय मुंडे अँड गँग जबाबदार असेल,' असंही त्या म्हणाल्या.