बीड: अलीकडेच देशभरातील पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर निवडणूक आयोगाने काही ठिकाणच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये कोल्हापूरमधील उत्तर मतदारसंघाचा (Uttar Kolhapur Bypoll Election) समावेश असून, या ठिकाणी पोटनिवडणूक घेतली जाणार आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी येत्या १२ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून, कोल्हापूरमध्ये रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. यातच आता करुणा शर्मा-मुंडे यांनीही (Karuna Sharma) ही निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवल्याचे सांगितले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर चर्चेत आलेल्या करुणा शर्मा यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे जाहीर केले आहे. काही महिन्यांपूर्वी करुणा शर्मा यांनी शिवशक्ती सेना पक्ष स्थापन केला असून, याच पक्षाकडून त्या अधिकृत उमेदवार असतील, अशी माहिती देण्यात आली आहे.
२०२४ मध्ये नवरा विरुद्ध बायको लढत होणार हे नक्की
आगामी सन २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत बीडमध्ये धनंजय मुंडे विरुद्ध करुणा शर्मा अशी लढत शंभर टक्के होणार आहे. काँग्रेसला जर बिनविरोध निवडणूक करायची असेल तर त्यांनी मला पाठिंबा द्यावा. माझ्यावर जेव्हा अन्याय झाला तेव्हा कोणी आवाज उठवला नाही. आता पुन्हा एकदा संधी आहे, लोकांनी मला साथ द्यावी. आता कोल्हापुरातून निवडून आले तरीसुद्धा मी बीडमध्ये निवडणूक लढवणारच, असा एल्गार करुणा शर्मा यांनी केला आहे. त्या एबीपी माझाशी बोलत होत्या.
निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे
करुणा शर्मा कोल्हापूर पोटनिवडणुकीत शिवशक्ती सेनेच्या अधिकृत उमेदवार असतील. गेले काही दिवस पक्षातर्फे कोण उमेदवार असेल यावर मंथन झाले. माझा लढण्याचा कोणताही विचार नव्हता. एक महिन्यांपूर्वी पत्रकार परिषद घेतल्यानंतर अनेक लोक, उमेदवार भेटले. निवडणुकीला मी उभे राहावे अशी सर्वांची इच्छा आहे. आज इतके पक्ष आहेत आणि १३ कोटी जनता आहे. आज इतका भ्रष्टाचार सुरु असून, कोणीही आवाज उठवत नाही. मी आवाज उठवला असून, निवडणुकीला उभे राहण्याचा अधिकार आहे, असेही त्या म्हणाल्या. तसेच जर आपण आत्ता सत्तेत आलो तर काय वाईट असे माझी टीम सांगत आहे. २०२४ मध्ये तर नवरा विरुद्ध बायको लढत होणार असल्याचे नक्की आहे. संपूर्ण जगात याची चर्चा होणार आहे. धनजंय मुंडे विरुद्ध करुणा मुंडे अशी लढत होणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, निवडणूक आगोयाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, २४ मार्चपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. तर अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस २८ मार्च असेल. तर १२ एप्रिल रोजी मतदानाची होणार पडणार असून १६ एप्रिल रोजी मतमोजणी होईल. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत जाधव हे विजयी झाले होते. मात्र डिसेंबर महिन्यात त्यांचे अकाली निधन झाले. त्यानंतर आता या मतदारसंघासाठी पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. दुसरीकडे, भाजपने माजी नगरसेवक सत्यजित उर्फ नाना कदम यांना उमेदवारी जाहीर केली आहे.