संपूर्ण राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीला सुरुवात झाली आहे. चिंचवडमध्ये भाजपाच्या अश्विनी जगताप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे यांच्यात तर कसब्यामध्ये भाजपाचे हेमंत रासने आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यात मुख्य लढत दिसून येत आहे. या मतमोजणीतील पोस्टल मतमोजणीचे कल समोर आले आहेत.
पोस्टल मतमोजणीत चिंचव़डमध्ये भाजपाच्या अश्विनी जगताप यांनी आघाडी मिळवली आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे आणि अपक्ष राहुल कलाटे यांना मागे टाकले आहे. अश्विनी जगताप ३०० हून अधिक मतांनी आघाडीवर असल्याचे वृत्त येत आहे. तर लक्षवेधी ठरलेल्या कसबा पेठ मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आघाडी मिळवली आहे. तर भाजपाचे हेमंत रासने पिछाडीवर पडले आहे. कसब्यात पोस्टल मतांमध्ये रवींद्र धंगेकर यांनी २०० मतांनी आघाडी घेतल्याचे प्राथमिक वृत्त आहे.
कसबा पेठमधील भाजपाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडमधील भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांचं अकाली निधन झाल्याने या दोन्ही मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक लागली होती. या पोटनिवडणुकीसाठी रविवार २६ फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते. सुमारे ५० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.