दोन पोटनिवडणुका दोन पॅटर्न, कुठला वाढवणार कुणाचं टेन्शन? असं दिसतंय पुढचं समिकरण  

By बाळकृष्ण परब | Published: March 2, 2023 05:49 PM2023-03-02T17:49:25+5:302023-03-02T17:54:16+5:30

Assembly by Election Results: कसबा आणि् चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकांमधून दोन पॅटर्न स्पष्टपणे दिसून आले आहेत. त्या पॅटर्नचा महाष्ट्रातील राजकारणावर आणि पुढील लोकसभा व विधानसभा निवडणुकांवरही ठळक परिणाम होताना दिसणार आहे. 

Kasba, Chinchwad by Election Results: Two by-elections, two patterns, which one will increase the tension of the other one, it seems like the next equation in Maharashtra | दोन पोटनिवडणुका दोन पॅटर्न, कुठला वाढवणार कुणाचं टेन्शन? असं दिसतंय पुढचं समिकरण  

दोन पोटनिवडणुका दोन पॅटर्न, कुठला वाढवणार कुणाचं टेन्शन? असं दिसतंय पुढचं समिकरण  

googlenewsNext

- बाळकृष्ण परब 
सध्याच्या राजकीय उलथापालथीमध्ये राज्यातील राजकारणासाठी महत्त्वाच्या असलेल्या कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं होतं. या पोटनिवडणुकीतील निकालामध्ये भाजपाला पारंपरिक बालेकिल्ला असलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघात दारुण पराभव पत्करावा लागला आहे. इथे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी बाजी मारली आहे. तर तर चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडखोरीचा लाभ झाल्याने भाजपाच्या उमेदवार अश्विनी जगताप ह्या विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचल्या आहेत. दरम्यान, या दोन मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकांमधून दोन पॅटर्न स्पष्टपणे दिसून आले आहेत. त्या पॅटर्नचा भाजपा व शिंदेंची शिवसेना आणि दुसरीकडे महाविकास आघाडी यांच्यात विभागलेल्या महाष्ट्रातील राजकारणावर आणि पुढील लोकसभा व विधानसभा निवडणुकांवरही ठळक परिणाम होताना दिसणार आहे. 

यातील पहिला पॅटर्न दिसून आला तो पुण्यातील कसबा मतदारसंघात. हा मतदारसंघ भाजपाचा पारंपरिक बालेकिल्ला. एक दोन अपवाद वगळता गेल्या ४०-४५ वर्षांत येथे भाजपाचा पराभव झाला नव्हता. मात्र ही पोटनिवडणूक त्याला अपवाद ठरली. येथे सहानुभूतीची लाट असण्याची शक्यता विचारात न घेता भाजपाने दिवंगत मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी न देता ती हेमंत रासनेंना दिली. तर प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीकडून काँग्रेसने रवींद्र धंगेकरांच्या रूपात तगडा जनसंपर्क असलेला उमेदवार दिला. एवढंच नाही तर संपूर्ण प्रचारामध्ये महाविकास आघाडीमध्ये कमालीचं ऐक्य दिसून आलं. वरिष्ठ पातळीवरील नेत्यांकडूनही शिस्तबद्ध प्रचार झाला. तसेच विविध माध्यमातून भाजपाविरोधात वातावरणनिर्मिती करण्यातही महाविकास आघाडी आणि काँग्रेसला यश आलं. त्यामुळे ही निवडणूक भाजपाला जड जाणार असं सुरुवातीपासूनच दिसत होतं. अखेर तसंच घडलं.

दुसरीकडे भाजपाच्या गोटात मात्र सुरुवातीपासूनच गोंधळ दिसून आला. अगदी उमेदवार निवडीपासून या गोंधळाला सुरुवात झाली होती. सहानुभूतीचा लाभ घेण्यासाठी टिळक कुटुंबात उमेदवारी द्यायची का, याचाही विचार झाला. मात्र अखेरीस रासनेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले. मात्र त्यामुळे सहानुभूतीचा मुद्दा या निवडणुकीतून निघून गेला. तसेच भाजपाच्या पारंपरिक मतदारांत नाराजीचं वातावरण निर्माण झालं. ते दूर करण्याचे सकारात्मक प्रयत्न झाले नाहीत. त्याचा परिणाम म्हणून भाजपाच्या मतदारांचं मतदान कमी झाल्याचंही दिसून आलं. त्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि इतर नेत्यांनी केलेल्या आक्रमक प्रचारामुळे भाजपा बॅकफूटवर गेल्याचे चित्र होते. त्यात गिरीश बापट यांना आजारी असताना प्रचारासाठी आणल्याचा मुद्दा विरोधकांनी आक्रमकपणे भाजपाविरोधात वापरला. तसेच मतदानादिवशी झालेले गैरप्रकारांचे आरोप आणि धंगेकरांचे उपोषण यामुळेही भाजपाच्या विरोधात वातावरणनिर्मिती झाली. अखेरीस या सर्वाचा फायदा घेत धंगेकर विजयी झाले. त्यांच्या विजयामुळे भाजपाविरोधात प्रबळ उमेदवार देऊन, शिस्तबद्ध प्रचार करत परस्परात ऐक्य राखले तर भाजपाला पराभूत करता येते, हे या पॅटर्नमधून दिसून आले. 

या पोटनिवडणुकीतील दुसरा पॅटर्न दिसून आला तो पिंपरी चिंचवड मतदारसंघामध्ये. पिंपरी-चिंडवडणमधील पोटनिवडणुकीसाठी भाजपाने दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली. या मतदारसंघात सहानुभूतीच्या लाटेचा विचार केला गेला. तसेच अपेक्षेप्रमाणे अश्विनी जगताप यांनी येथे ३० हजारांहून अधिक मताधिक्यासह विजयी आघाडी घेतली आहे. मात्र या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांच्याविरोधात राहुल कलाटे यांनी केलेली बंडखोरीही निर्णायक ठकताना दिसत आहे. तसेच कलाटे यांच्या बंडखोरीमुळे मतविभाजन होऊन निकालाला कलाटणी मिळाल्याचे आकडे समोर येत आहेत. ३३ व्या फेरीच्या आकडेवारीपर्यंत पाहिल्यास अश्विनी जगताप यांना १ लाख २५ हजार १३० मते मिळाली आहेत. तर नाना काटे यांना ९१ हजार २१६ आणि राहुल कलाटे यांना ४० हजार ५०७ मते मिळाली आहेत. या आकडेवारीचा विचार केल्यास कलाटेंनी बंडखोरी केली नसती तर या मतदारसंघातही कसब्याप्रमाणेच निकाल लागला असता असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. कदाचित अश्विनी जगताप जिंकल्या असत्या तरी त्यांना मोठं मताधिक्य मिळालं नसतं.

त्यामुळे चिंचवडमधील हा पॅटर्न पुढच्या लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीसाठी अडचणीचा ठरू शकतो. त्याचं कारण म्हणजे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट या तीन पक्षांसोबत इतक काही छोटे मोठे पक्ष असल्याने या सार्वत्रिक निवड़णुकांच्या वेळी अनेक इच्छुकांना उमेदवारी नाकारली जाणे अपरिहार्य ठरणार आहे. अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर बंडखोरीला उत येण्याची दाट शक्यता आहे. त्यातच मतविभाजन घडवून निकालावर प्रभाव पाडू शकतील अशा बंडखोरांना भाजपाकडून पाठबळ मिळण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे आतापर्यंत पुढील निवडणुका एकत्र ल़ढण्याची रणनीती आखणाऱ्या महाविकास आघाडीमधील घटक पक्षांची पुढच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी डोकेदुखी वाढू शकते. त्यामुळे आजच्या निकालांमुळे राज्याच्या आणि देशाच्या राजकारणावर फार मोठा परिणाम होणार नाही. मात्र हे दोन पॅटर्न पुढच्या काही काळासाठी महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचे ठरतील, एवढं नक्की!

Web Title: Kasba, Chinchwad by Election Results: Two by-elections, two patterns, which one will increase the tension of the other one, it seems like the next equation in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.