कासेगाव जि़ प गट : तिसऱ्या आघाडीची भालके गटाशी जवळीकपंढरपूर : आॅनलाईन लोकमत तालुक्याचे लक्ष लागलेल्या कासेगाव जि़ प़ गटात नाट्यमय घडामोडी घडल्या़ कारण या गटात स्थानिक पातळीवर आ़ भालके गट, परिचारक गट आणि परिचारक समर्थक तिसरी आघाडी असे चित्र आहे़ तिसऱ्या आघाडीवरच येथील राजकारण अवलंबून आहे; मात्र अचानक या तिसरी आघाडीने परिचारक गटाशी फारकत घेत आ़ भालके गटाशी जवळीक केली आहे.कासेगाव गट सर्वसाधारण असल्याने या गटाने तालुक्याचे लक्ष वेधले आहे़ या गटात आ़ भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके आणि पांडुरंग साखर कारखान्याचे उपाध्यक्ष वसंतराव देशमुख यांच्यात सरळ लढत होत आहे़ त्यामुळे तालुक्यात सर्वाधिक चुरशीची लढत होणार हे नक्की!गेल्या दहा वर्षांपासून कासेगावात स्थानिक पातळीवर वसंतराव देशमुख यांच्या विरोधात परिचारक समर्थकच हरिभाऊ गावंधरे, सीताराम भुसे, बाळासाहेब शेख, आप्पासाहेब जाधव यांची तिसरी आघाडी कार्यरत आहे़ ही तिसरी आघाडीच आ़ भालके आणि परिचारक या दोन गटासाठी निर्णायक मानली जाते़ परिचारक यांच्या ताब्यात असलेल्या पांडुरंग कारखान्याचे विद्यमान संचालक बाळासाहेब शेख यांच्या नेतृत्वाखालीच तिसरी आघाडी कार्यरत आहे़ या तिसऱ्या आघाडीने कासेगाव ग्रामपंचायत निवडणुकीत भालके गटाबरोबर हातमिळवणी करून सत्ता स्थापन केली़ त्यानंतर आ़ भालके आणि तिसऱ्या आघाडीची जवळीक वाढली. या तिसऱ्या आघाडीने वसंतराव देशमुख यांना विरोध दर्शविला होता; मात्र वसंतराव देशमुख यांचा जनसंपर्क आणि निवडून येण्याची क्षमता लक्षात घेऊन परिचारक गटाने देशमुख यांना उमेदवारी दिली़ त्यामुळे नाराज झालेल्या तिसऱ्या आघाडीच्या नेत्यांनी भालके गटाशी दोस्ताना करून पं़ स़ गणासाठी सीताराम भुसे यांची उमेदवारी मिळविली़ दुसरीकडे भालके समर्थक सरकोली येथील राजेंद्र भोसले आणि महेंद्र जाधव यांनी आपला अर्ज कायम ठेवल्याने हे दोघे भालकेंची डोकेदुखी ठरणार हे नक्की!
कासेगाव जि़ प गट : तिसऱ्या आघाडीची भालके गटाशी जवळीक
By admin | Published: February 16, 2017 7:00 PM