सातारा : मुलांच्या गुणवत्तेला त्यांच्या तीव्र इच्छाशक्तीचे बळ मिळाल्यास काय चमत्कार होतो, याचे उदाहरण साताऱ्यातील कश्मिरा संदीप पवार या मुलीने दाखवून दिले आहे. वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी कश्मिरा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या माध्यमातून ‘सीबीआय अधिकारी’ बनली आहे. रयत शिक्षण संस्थेमध्ये कश्मिराचा संस्थेचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते तिचा गौरव करण्यात आला. ‘महाराष्ट्रातील मुलींनी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये सहभाग नोंदवून कश्मिरा पवार हिच्याप्रमाणे प्राविण्य मिळवावे,’ असे उद्गार शरद पवार यांनी यावेळी काढले. या कार्यक्रमास विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, सचिव व शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर, माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम, दिलीप वळसे-पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, कश्मिराने अत्यंत कमी वयात हे यश मिळविले आहे. शिवाजी कॉलेजमधील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातील शिक्षकांचे तिला मार्गदर्शन लाभले. अत्यंत चिकाटीने अभ्यास, सातत्य यामुळेच हे यश मिळाल्याचे कश्मिराने नमूद केले आहे. सहसचिव डॉ. डी. डी. पाटील, कर्मवीर विद्या प्रबोधिनीचे प्राचार्य आर. के. शिंदे, संचालक डॉ. शिवाजी पाटील, डॉ. एम. एस. शिंदे, डी. सी. जाधव, राजकुमार पाटील यांचे तिला मार्गदर्शन लाभले. (प्रतिनिधी)
कश्मिरा बनली ‘सीबीआय आॅफिसर’
By admin | Published: May 19, 2015 10:43 PM