ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २ : काश्मिरची समस्या एका दिवसाची नसून ती सोडविण्याकरीता राजकीय मार्ग काढायला हवा. काश्मीरचा मुददा देशाच्या एकतेच्या दृष्टीने महत्त्वाचा असून सरकारने आधी काश्मीरसारख्या घरातील प्रश्नाला सोडविण्याकरीता प्राधान्य द्यायला हवे, असे संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष व खासदार शरद यादव यांनी सांगितले. दरम्यान, उत्तरप्रदेशातील निवडणुकांमध्ये सध्या तरी एकटे लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पुण्यात एका कार्यक्रमानंतर यादव यांनी विविध मुद्यांवर पत्रकारांशी संवाद साधला. काश्मीर प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, काश्मिर प्रश्न हा दिवसेंदिवस गंभीर होत असून संसदेत त्यावर विस्तृत चर्चा होत आहे. सरकार सोबत विरोधी पक्षाची याबाबत बैठकही झाली आहे. हा घरातील प्रश्न असून सरकारने त्यासाठी अधिक प्राधान्य द्यायला हवे. देशातील जातीव्यवस्थेमध्ये स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांनीदेखील बदल झालेला नाही. यामुळे देश कमजोर होत असल्याचे चित्र आहे. आपले पंतप्रधान गोरक्षणाची चर्चा करतात, परंतु आज देशातील नागरिक किती सुरक्षित आहेत, असा सवालही त्यांनी यावेळी केला.
देशातील भ्रष्टाचार वाढत आहे. बांधकाम व्यावसायिकांच्या हलगर्जीपणामुळे पुण्यामध्ये इमारत कोसळ्याची घटना घडली. यामध्ये मजूरांचे प्राणही गेले. अशा घटनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना दोन लाख इतकी भरपाई देऊन न्याय देण्यात आला. या घटनांवरुन बांधकाम व्यावसायिक नियम पाळत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अच्छे दिन आले आहेत, असे म्हणताना देशाची स्थिती सुधारण्याऐवजी पूर्वीपेक्षा वाईट झाल्याचे दिसते, असे यादव यांनी नमुद केले.