निपाणी (जि. बेळगाव)/ श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत बुदिहाळ (ता. निपाणी, जि. बेळगाव) येथील जवान प्रकाश पुंडलिक जाधव (२९) शहीद झाले. मंगळवारी पहाटे ही चकमक झाली. कुलगाम व पुलवामा जिल्ह्यात मंगळवारी दोन वेगवेगळ्या चकमकीत तीन अतिरेकी ठार, तर प्रकाश जाधव शहीद झाले आणि दोन जवान जखमी झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. प्रकाश जाधव हे २००७ साली मराठा लाइट इन्फंट्रीत बेळगाव येथे भरती झाले होते. दिवाळीला ते घरी येऊन गेले होते. सोमवारी रात्री १० च्या दरम्यान त्यांनी घरच्यांशी संपर्क साधून खुशालीही कळवली होती. पहाटे त्यांना वीरमरण प्राप्त झाले. प्रकाश यांचा विवाह दोन वर्षांपूर्वी झाला असून त्यांना ३ महिन्यांची मुलगी श्रावणी आहे. वडील पुंडलिक जाधव यांनीही सैन्यात सेवा बजावली असून ते सध्या निवृत्त आहेत.