राजनाथसिंह यांचा विश्वास । पाकला परिणाम भोगावेच लागतीलमुंबई : काश्मीरमधील आजच्या परिस्थितीला पाकिस्तानच जबाबदार असल्याचे सांगत, येत्या वर्षभरात काश्मीरची परिस्थितीत निश्चितपणे सुधारून दाखवू, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी व्यक्त केला. ‘लोकमत महाराष्ट्रीय आॅफ द इयर’ कार्यक्रमात ‘आज तक’च्या न्यूज अँकर व पत्रकार अंजना कश्यप यांनी ही मुलाखत घेतली. प्रश्न : काश्मीरमध्ये ७० टक्के मतदान व्हायचे, तिथे पोटनिवडणुकीत ७ टक्के मतदान होते, याचा अर्थ मेहबुबा मुफ्ती सरकारमुळे जनतेचा भ्रमनिरास झाला आहे, असे आपल्याला वाटते काय? राजनाथसिंह : मेहबुबा सरकारमुळे जनतेचा भ्रमनिरास झालेला नाही. मात्र, तेथील परिस्थिती चिघळत ठेवण्याचे काम पाकिस्तान करीत आहे. थोडी प्रतीक्षा करा. वर्षभरात तेथील परिस्थितीत मोठे परिवर्तन झाल्याचे दिसेल. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांनी दगडफेक करणाऱ्या काश्मिरी तरुणांचे समर्थन केले आहे...? त्यांनी तसे करायला नको होते. फारुख अब्दुल्ला हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याकडून अशा विधानांची मला अपेक्षा नव्हती. काश्मीरला पुराने वेढले, तेव्हा आपले जीव धोक्यात घालून तेथील लोकांना वाचविण्याचे काम लष्करानेच केले. त्यांच्यावर दगडफेक करण्याचे समर्थन कसे होऊ शकेल? दगडफेक करणाऱ्यांना कसे निपटणार? कोणतेच सरकार आपली रणनीती सांगत नसते. परिस्थती नक्कीच बदलेल, हे मी आज विश्वासाने सांगू शकतो. पेलेट गन्स वा पावा शेल्सचा वापर करताना महत्त्वाच्या अवयवांना इजा होणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेश लष्कराला दिलेले आहेत. देशहिताच्या आड कोणीही आले, तरी त्यांचा मुलाहिजा ठेवला जाणार नाही, अशी भूमिका लष्करप्रमुखांनी घेतली आहे. आपले मत काय? मी त्यांच्या मताशी शंभर टक्के सहमत आहे. जे दहशतवादी वा कोणीही देश अस्थिर करू इच्छितात, त्यांना त्याचे परिणाम हे भोगावेच लागतील. कोणाचीही गय केलीच जाणार नाही. ट्रिपल तलाक, राममंदिर आणि गोहत्या बंदी याबद्दल स्पष्ट भूमिका काय? राजनाथसिंह : ट्रिपल तलाकबाबत केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट आहे आणि आम्ही ती सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे मांडली आहे. ट्रिपल तलाक हा पुरुष-महिला समानतेच्या हक्काचे उल्लंघन करणारा आहे. कोणत्याही जात, धर्म, पंथातील महिलेवर ती केवळ महिला आहे, म्हणून अन्याय होता कामा नये. शिवाय, कुराणमध्ये ट्रिपल तलाकचा उल्लेख नाही, अशी माझी माहिती आहे. राम जन्मभूमीचा मुद्दा न्यायप्रविष्ठ आहे. त्यात मध्यस्थी करण्याची तयारी सर्वोच्च न्यायालयाने दर्शविलेली आहे. दोन्ही बाजू एकत्र बसून समस्येचे समाधान करणार असतील, तर केंद्र सरकार त्याचे स्वागतच करेल. तसे होऊ शकले नाही, तर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आम्हाला मान्य असेल. गोहत्याबंदीबाबत सर्वांचे एकमत व्हावे आणि तसे झाले तर कायदा बनण्यात अडचण येणार नाही. भाजपाचे सरकार आले की हिंदू राष्ट्राची चर्चा सुरू होते. आता योगी आदित्यनाथ यांनी हिंदू राष्ट्राची संकल्पना चुकीची नाही, असे विधान केले आहे. आपले मत काय?त्या विधानावर मी बोलणार नाही. मात्र, हिंदू हा जीवन जगण्याचा मार्ग असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. जगातील अनेक विकसित देशदेखील धर्मनिष्ठ आहेत, पण भारत सेक्युलर म्हणजेच धर्मनिरपेक्ष आहे. धर्म, जातीच्या नावावर इथे भेदभाव केला जात नाही. दाऊदला भारतात आणणार असे आपण म्हटले होते. त्याचे काय झाले?तो कराचीतच आहे हे नक्की. भारतातील त्याच्या संपत्तीवर जप्ती आणून तिचा लिलाव केला जातोय. निश्चित रणनीतीनुसार आम्ही पाकिस्तानवर दबाव वाढवत आहोत.
काश्मीरची स्थिती वर्षभरात सुधारणार
By admin | Published: April 13, 2017 2:18 AM