ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ४ - लोकमान्य टिळकांना ब्रिटिश एजंट म्हणणारे मार्कंडेय काटजू वे्या मोहम्मद तुघलकाचे एजंट असून त्यांची कायद्याची डिग्री तपासून बघण्याची गरज आहे अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काटजूंना फटकारले आहे.
मार्कंडेय काटजू यांनी काही दिवसांपूर्वी लोकमान्य टिळक हे ब्रिटिश एजंट असल्याचे विधान केले होते. यावरुन मंगळवारी उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून काटजूंवर टीका केली आहे. गांधीजी व अन्य महान व्यक्तींवर मुक्ताफळे उधळणारे काटजू हे अजूनही सुखात जगत आहेत. काटजू यांचे डोके फिरले असून त्यांनी सोनिया गांधींना शंकराचार्यांचे आणि सरसंघचालकांना जामा मशिदीचे एजंट ठरवल्यास आश्चर्य वाटणार नाही असे त्यांनी म्हटले आहे.कर्तबगार व थोर व्यक्तींवर चिखलफेक करणे हा काटजू यांचा जोडधंदा असून ठाण्यातील मनोरुग्णालयाला काटजूंचे नाव द्यायला हवे असे टोलाही त्यांनी लगावला आहे.