राष्ट्रवादीला खिंडार पाडण्याच्या गुप्त डावपेचांना ‘कात्रजचा घाट’! ‘ कथालेखक संजय राऊत, निर्माते-दिग्दर्शक शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 12:43 PM2023-04-19T12:43:16+5:302023-04-19T12:44:27+5:30
Sharad Pawar: निर्माते-दिग्दर्शक शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संजय राऊत यांनी राज्यातील सत्ताकारणाच्या सीझन-३ चे कथालेखन करून राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पाडण्याच्या भाजपच्या सुरू असलेल्या डावपेचांना छेद दिल्याचे मानले जात आहे.
- सुनील चावके
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचा बहुप्रतीक्षित निकाल येण्यापूर्वी निर्माते-दिग्दर्शक शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संजय राऊत यांनी राज्यातील सत्ताकारणाच्या सीझन-३ चे कथालेखन करून राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पाडण्याच्या भाजपच्या सुरू असलेल्या डावपेचांना छेद दिल्याचे मानले जात आहे.
साडेतीन वर्षांपूर्वी नोव्हेंबर, २०१९ मध्ये राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या तोंडचा घास पळवून महाविकास आघाडीची सत्ता आणताना शरद पवार आणि संजय राऊत यांनी राज्यातील कुरघोडीच्या राजकारणाचे सीझन-१ चे नाट्यमय सादरीकरण केले होते. अडीच वर्षांनंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मदतीने जून, २०२२ मध्ये सीझन-२चे कथानक लिहून कुणाच्या ध्यानिमनी नसताना, मविआची सत्ता उलथवून टाकणारे कथानक लिहून प्रत्यक्षात साकारले, पण पक्षांतरबंदी कायद्याची किनार लाभलेला राज्यातील सत्तांतराचा निकाल सर्वोच्च न्यायालयात राखून ठेवल्यामुळे भाजप-शिवसेना आघाडीत कमालीची अस्वस्थता आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागण्यापूर्वी राज्यातील सत्ता शाबूत राखण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यासाठी, तसेच लोकसभेतील ४२ जागांचे संख्याबळ कायम राखण्यासाठी भाजप गुंतला आहे. त्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या तीन डझन आमदारांना लक्ष्य करण्याचे भाजपकडून होत असलेले छुपे प्रयत्न शरद पवार यांनी संजय राऊत यांच्या मदतीने सीझन-३ मध्ये उघड केल्याचे मानले जात आहे.
विधानसभा व लोकसभेतील संख्याबळ सुरक्षित करण्यासाठी भाजप राष्ट्रवादी काँग्रेसवर जाळे फेकण्यात गुंतला आहे. भाजपकडून पवार कुटुंबातील सदस्यांना टार्गेट केले जात आहे. ‘कोणालाही मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस सोडून जायचे नाही. कोणी व्यक्तिगत निर्णय घेऊ शकतात, पण पक्ष म्हणून आम्ही भाजपसोबत जाणार नाही,’ अशी व्यथा शरद पवार यांनी खासगीत उद्धव ठाकरेंसमक्ष राऊत यांच्यासमोर कथितपणे बोलून दाखवली. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठकीत राजकीय नेते म्हणून सामील होणारे संजय राऊत यांनी पत्रकार म्हणून भाजपच्या पडद्यामागच्या डावपेचांची ‘थीम’ स्तंभातून उघड केली. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राऊत यांनी सीझन-३ चे कथालेखन करून भाजपचा डाव उलटवून लावला. आज त्यावर अजित पवार यांनी शिक्कामोर्तब केले आहे.