सिंधुदुर्ग : शहीद मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या कुटुंबीयांना कोणाच्याही वैयक्तिक अर्थिक मदतीची आवश्यकता नाही. त्यामुळे कुटुंबीयांना अर्थिक मदत करण्याऐवजी जर इच्छा असेलच तर ती रक्कम गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला किंवा सामाजिक संस्थेला द्यावी. तसेच शहीद कौस्तुभचे शौर्य व त्यांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाचा कोणीही स्वत:च्या फायद्यासाठी किंवा राजकीय स्वार्थासाठी वापर करू नये, असे आवाहन शहीद मेजर कौस्तुभ यांचे चुलत काका विजय रावराणे यांनी पुन्हा एकदा वैभववाडीतील पत्रकार परिषदेत केले आहे.वैभववाडी येथील भैरी भवानी प्रतिष्ठानच्या संपर्क कार्यालयात रावराणे यांनी पत्रकार परिषद घेतली या वेळी बंडू मुंडल्ये उपस्थित होते. रावराणे पुढे म्हणाले, कणकवलीतील दहीहंडी रद्द करून दहीहंडीची रक्कम शहीद मेजर कौस्तुभ रावराणेंच्या कुटुंबाला देण्यात येणार असल्याचे काही लोकांनी जाहीर केले. तसे वृत्त आमच्या वाचनात आले. परंतु, कौस्तुभच्या अंत्यविधीनंतर सोशल मीडियातून मदतीचे मेसेज पसरू लागताच अर्थिक मदतीसंदर्भात आम्ही भूमिका स्पष्ट केली होती. तरीही पुन्हा अर्थिक मदतीचा विषय पुढे आला आहे. आम्ही त्यांच्या भावनांचा आदर करतो. परंतु, कोणाचीही वैयक्तिक मदत आम्हाला नको.ते म्हणाले, ‘शहीद मेजर कौस्तुभ यांच्या बलिदानाचा कोणीही स्वत:च्या फायद्यासाठी तसेच राजकीय स्वार्थासाठी वापर करू नये, अशी आम्हा कुटुंबीयांकडून सर्वांना विनंती आहे. ज्या कोणाला मदत द्यावयाचीच असल्यास त्या पैशातून हवीतर सैनिक अॅकॅडमी सुरू करून जिल्ह्यातील तरुणांना सैन्य भरतीचे प्रशिक्षण द्यावे. किंवा गोरगरीब विद्यार्थी, गरजू रुग्णांना अथवा एखाद्या सामाजिक संस्थेला मदत द्यावी. त्याला आमचा विरोध असणार नाही. कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही.>नीतेश राणे यांच्या भावनांचाही आदरच'शासनाकडून शहीद मेजर कौस्तुभ यांच्या कुटुंबाला मदत मिळणारच आहे. त्यामुळे इतरांकडून येणाऱ्या मदतीतून एखादे सामाजिक कार्य झाल्यास आम्हाला आवडेल. त्यामुळे आमदार नीतेश राणे यांच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. त्यांच्या भावनांचाही आदर करतो. परंतु बलिदानाचे राजकारण आम्हाला होऊ द्यायचे नाही. त्यामुळे त्यांनी देऊ केलेली मदत आम्हाला नको, तसेच यापुढे कोणीही अशा प्रकारे कौस्तुभच्या कुटुंबाला मदत करण्याचे जाहीर करू नये. आम्ही ती स्वीकारणार नाही, असे रावराणे यांनी स्पष्ट केले़
कौस्तुभच्या बलिदानाचा राजकीय वापर नको
By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2018 5:13 AM