सांगली - राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या सांगलीमधील कवठे महांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये दिवंगत आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे १० उमेदवार विजयी झाले. दरम्यान, नगरपंचायतीमधील दणदणीत विजयानंतर रोहित पाटील यांना आता आमदारकीसाठी विधानसभेची निवडणूक लढवणार का, अशा प्रश्न विचारला होता. त्यावर रोहित पाटील यांनी स्पष्ट आणि सूचक उत्तर दिलं आहे.
याबाबत विचारले असता रोहित पाटील म्हणाले की, आम्ही लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि लोकहितासाठी या मतदारसंघामध्ये काम करत आहोत. त्यामुळे लोक जो निर्णय घेतील तो शेवटपर्यंत आम्हाला मान्य असेल. तसेच विधानसभेच्या निवडणुकीबाबच म्हणाल तर जर पक्षाने जबाबदारी दिली तर लोकहिताच्या दृष्टीने तसा निर्णय घ्यायला काही हरकत नाही, असे रोहित पाटील यांनी सांगितले.
कवठे महांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये रोहित पाटील यांच्यासमोर सर्वपक्षीय आघाडीने मोठे आव्हान उभे केले होते. मात्र हे आव्हान मोडून काढत रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने १० जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले. आघाडीला ६ तर इतरांच्या खात्यात एक जागा गेली.
दरम्यान, या विजयानंतर रोहित पाटील यांनी कवठेमहांकाळमधील सर्व मतदारांचे ट्विट करून आभार मानले. त्यामध्ये ते म्हणाले की, सर्वप्रथम कवठेमहांकाळमधील सर्व नागरिकांचे मनःपूर्वक आभार! कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणूकीत आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलला अभूतपूर्व विजय आपण मिळवून दिलात. विजयानंतर खऱ्या अर्थाने जबाबदारी वाढते, कवठेमहांकाळ आणि परिसराच्या विकासासाठी आपण कटीबद्ध आहोत.