बुलडाणा : महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सहकार्याने , प्रगती सार्वजनिक वाचनालयाच्या पुढाकाराने बुलडाणा येथे १२ आणि १३ मार्च रोजी राज्यस्तरीय बालकुमार युवा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध कवी, गीतकार दासू वैद्य यांची निवड करण्यात आली आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गणेश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या एका बैठकीमध्ये साहित्य संमेलनाच्या आयोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी प्रगती सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षा श्रीमती अरूणा कुल्ली यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. दोन दिवसीय बालकुमार युवा साहित्य संमेलनात महाराष्ट्रातील दीडशेपेक्षा जास्त लेखक, साहित्यिक विविध कार्यक्रमात सहभागी होणार असून कार्यक्रमाच्या संयोजनपदी नरेंद्र लांजेवार यांची निवड करण्यात आली आहे.यासंदर्भात लवकरच एक स्वागत समिती गठीत करण्यात येणार आहे. या संमेलनात बालकुमार आणि युवकांसाठी कवी संमेलन, मुलाखत, परिसंवाद, अभिरूप न्यायालय, रिंगण नाट्य, प्रगट मुलाखत, मराठी-हिंदी-उर्दू गजल मुशायरा, युवा कट्टा, युवाजल्लोष अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा मानस आहे. या साहित्य संमेलनाच्या स्वागत समितीत सहभागी होऊ इच्छिणार्यांनी २५ मार्चपर्यंत श्रीमती अरूणा कुल्ली, पंजाबराव गायकवाड, कि.वा.वाघ, प्रा.सुनील देशमुख यांच्याकडे नाव नोंदणी करावी असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने शाहिणा पठाण यांनी केले आहे.
बालकुमार युवा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी कवी दासू वैद्य
By admin | Published: February 24, 2016 2:11 AM