ऑनलाइन लोकमत
गुवहाटी, दि. १२ - सावरपाडा एक्सप्रेस म्हणून प्रसिद्ध असलेली महाराष्ट्राची अव्वल मॅरेथॉन धावपटू कविता राऊतने गुवहाटी येथे सुरु असलेल्या १२ व्या दक्षिण आशियाई स्पर्धेत शुक्रवारी सुवर्णपदक पटकावून ब्राझीलमध्ये होणा-या रिओ ऑलिम्पिकसाठी जागा निश्चित केली.
कविता राऊतने दोन तास ३८ मिनिट ३८ सेकंदात अत्यंत सहजतेने महिला मॅरेथॉन स्पर्धा जिंकली. रिओ ऑलिम्पिकमध्ये महिला मॅरेथॉनसाठी पात्र ठरलेली ती चौथी भारतीय धावपटू आहे. ओ.पी.जैशा, ललिता बाबर, सुधा सिंह याआधीच रिओ ऑलिम्पिकमध्ये महिला मॅरेथॉनसाठी पात्र ठरल्या आहेत.
श्रीलंकेची एनजी राजासेकरा दोन तास ५० मिनिट ४७ सेंकदाची वेळ नोंदवत दुसरी तर, बी.अनुराधी तिसरी आली. १२ व्या दक्षिण आशियाई स्पर्धेतून रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली कविता राऊत एकमेव अॅथलीट आहे.
मूळच्या नाशिकच्या सावरपाडा या गावातून आलेल्या कविता राऊतला 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कारने सन्मानित करण्यात आले होते.
कविता राऊतला पती महेश तुंगार, सासू यमुनाबाई तुंगार आणि भाऊ दिलीप राऊत यांनी तिच्या कामगिरीबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.