औरंगाबाद : महाराष्ट्राची लांब पल्ल्याची धावपटू आणि आॅलिम्पियन कविता राऊत हिचे लक्ष्य आहे ते लंडन येथे २0१७ मध्ये होणारी वर्ल्डचॅम्पियनशिप स्पर्धा. आॅलिम्पिकसह राष्ट्रकुल आणि आशिया स्पर्धेत आपला ठसा उमटवणाऱ्या कविता राऊत औरंगाबाद येथे पोलिसांच्या क्रीडा स्पर्धेच्या समारोपासाठी आली होती. रिओ आॅलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कविता राऊत हिने २0१0 साली झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत १0 हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत कास्यपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू म्हणून बहुमान मिळवला होता. तसेच तिने २0१0 मध्येच आशियाई क्रीडा स्पर्धेत १0 हजार मीटरमध्ये रौप्यपदक जिंकले होते. गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या प्रभावी कामगिरीत सातत्य राखणाऱ्या कविता राऊत हिने १0 कि.मी. रोड रनिंग रेसमध्ये ३४.३२ अशी वेळ नोंदवताना राष्ट्रीय विक्रम केला होता. अर्जुन पुरस्काराने सन्मानित कविता राऊत हिने आज पत्रकारांशी संवाद साधला.आॅलिम्पिकमध्ये देशाला अद्यापही पदकविजेती कामगिरी करता आली नसल्याची खंत तिने व्यक्त केली. याविषयी तिने बोलताना सांगितले, ‘खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचल्यानंतरच अद्ययावत सुविधा आणि चांगले प्रशिक्षक मिळतात. आॅलिम्पिकमध्ये पदकविजेते खेळाडू घडण्यासाठी जिल्हापातळीपासून आणि लहान वयापासूनच खेळाडूंना चांगले प्रशिक्षक, मैदान अशा सुविधा मिळणे नितांत गरजेचे आहे. खेळाडूंसाठी निवासी प्रशिक्षण सुविधा मिळायला हवी, असे घडले तरच देशात पदक विजेते खेळाडू घडतील.’आपण ग्रामीण भागातून आलो आहोत. ग्रामीण भागातील खेळाडूंना स्पर्धेसाठी जाण्यासाठी पैसेही नसतात. आॅलिम्पिकमध्ये बॅडमिंटन तारका पी.व्ही. सिंधू आणि महिला मल्ल साक्षी मलिक यांनीच देशासाठी पदकविजेती कामगिरी केली. त्यामुळे पालकांनीदेखील आपल्या मुलींना खेळासाठी प्रोत्साहन द्यायला हवे, असे तिने सांगितले. याप्रसंगी उपस्थित खेळाडूंना कविता राऊतने खेळात शिस्त, आहार आणि सातत्य महत्त्वपूर्ण असल्याचा संदेश दिला. (क्रीडा प्रतिनिधी)
कविता राऊतचे टार्गेट वर्ल्डचॅम्पियनशिप स्पर्धा
By admin | Published: November 11, 2016 5:04 AM