ऑनलाइन लोकमतपणजी, दि. २३ - कला अकादमीतर्फे जाहीर केलेल्या पहिल्यावहिल्या काव्यहोत्र सन्मान पुरस्कारासाठी प्रख्यात वात्रटिकाकार तसेच मराठी मुलखातील काव्य चळवळीचे प्रणोते रामदास फुटाणे यांची निवड केली आहे. कला अकादमीचे अध्यक्ष विष्णू सूर्या वाघ यांनी शनिवारी काव्यहोत्र सन्मान व काव्यहोत्र प्रशंसा या दोन्ही पुरस्कारांची घोषणा केली.दोन लाख रोख रुपये , मानपत्र, शाल व श्रीफळ असे काव्यहोत्र सन्मान पुरस्काराचे स्वरूप आहे. काव्यहोत्र प्रशंसा पुरस्कार प्रत्येकी 25 हजार रुपयांचा असून मानचिन्ह व शाल, श्रीफळ असे त्याचे स्वरूप आहे.काव्यहोत्र प्रशंसा पुरस्कार गोमंतकीय मराठी कवयित्री डॉ. अनुजा जोशी व गोमंतकीय कोकणी कवी नीलबा खांडेकर यांना देण्यात येणार आहे.आज, रविवारी (दि. 24) होणा-या काव्यहोत्रच्या समारोप सोहळ्यात मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात येणार आहेत. सायंकाळी चार वाजता होणा:या या कार्यक्रमास कला व संस्कृती मंत्री दयानंद मांद्रेकर, पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर, राजभाषा मंत्री मिलिंद नाईक उपस्थित असतील.मराठी कविता जागतिक स्तरावर पोहचविण्यासाठी रामदास फुटाणे यांनी दिलेले योगदान लक्षात घेऊन तसेच कवितेला पुस्तकातून बाहेर काढून सर्वसामान्यांर्पयत पोहचवण्यासाठी त्यांनी घेतलेल्या पुढाकाराचे मूल्यांकन करून काव्यहोत्र सन्मान पुरस्कारांसाठी त्यांची निवड केल्याचे वाघ यांनी जाहीर केले.अनेक वर्षे सातत्याने कोकणीतून लेखन करीत असलेले कवी नीलबा खांडेकर यांना काव्यहोत्र पुरस्कार देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे डॉ. अनुजा जोशी याही गोमंतकीय कवयित्री आहेत.
रामदास फुटाणे यांना काव्यहोत्र सन्मान पुरस्कार जाहीर
By admin | Published: July 23, 2016 10:11 PM