कवठेएकंद : कवठेएकंद (ता. तासगाव) येथे विजयादशमीनिमित्त उद्या, शुक्रवारी ग्रामदैवत श्री सिध्दराजांच्या पालखी सोहळ्यावेळी होणारी पारंपरिक आतषबाजी यंदाही होणार आहे. आतषबाजीवेळी अपघाताची शक्यता लक्षात घेता, यंदाच्यावर्षी पत्रीबाण, सुतळी अॅटमसह या धोकादायक दारुकामावर बंदी घालण्यात आली आहे. यंदा आतषबाजीचा उत्सव सुखरुप पार पडावा यासाठी प्रशासनाबरोबरच, ग्रामस्थांनीच धोकादायक दारुकाम टाळण्याचे ठरवले असून, लाकडी शिंगटे, चक्रे, झाडे, पंचमुखी, सूर्यपान, कागदी शिंगटे, रंगीत वेस अशा पारंपरिक दारुकामांच्या प्रकाराला अधिक पसंती दिली आहे.‘श्रीं’च्या पालखी सोहळ्यास शुक्रवारी रात्री ८.१५ वाजल्यापासून प्रारंभ होणार आहे. मानकरी चव्हाण—पाटील यांच्या उपस्थितीत शिलंगण चौक येथे दसऱ्याचं सोनं ‘आपटा पूजन’ होऊन श्री सिध्दराज आणि श्री महालिंगराया बिरदेवाच्या पालखीसह पूजाअर्चा होऊन आरती—दिवटी, छत्र चामर अश्वासह मोठ्या दिमाखात शिलंगणास प्रारंभ होतो. रस्त्याच्या दुतर्फा भाविक, ग्रामस्थांकडून शोभेच्या दारुच्या आतषबाजीचे सादरीकरण केले जाते. आतषबाजीच्या आगळ्या-वेगळ्या वैशिष्ट्यामुळेच ‘महाराष्ट्राची शिवकाशी’ अशी ओळख कवठेएकंदने करून दिली आहे. आतषबाजीचा उत्सव अधिक सुखकर करण्यासाठी यात्रा समिती, प्रशासन, पोलिसांकडूनही प्रबोधन करण्यात येत आहे.यंदाच्यावर्षी खास लक्षवेधी आकर्षण म्हणून ए—वन मित्रमंडळ, ईगल फायर वर्क्स यांच्याकडून सिध्दराज मंदिराच्या प्रवेशद्वाराची ४८ फुटी प्रतिकृती स्टार डिजिटल औट, ५00 औटांची सलामी दिली जाणार आहे. श्री सिध्दराज फायर वर्क्सकडून ‘मतदानाची जनजागृती’ आतषबाजीतून करण्यात येणार आहे.सिध्दिविनायक मंडळाकडून ‘आॅलिम्पिक सोहळ्यातील फायर शो’, उगवता सूर्य ‘स्टार आऊट’ बोरकर बंधू यांच्या श्रीराम फायर वर्क्सच्या ‘झुंबर औटांची बरसात’, ‘घागरी औट’ लक्षवेधी ठरणार आहे. फॅन्सी दारु शोभा मंडळाकडून ‘रंगीत झाडकाम’, ‘झुंबर औट’, तसेच बसवेश्वर फायर वर्क्सच्या ‘यंगस्टार फायर शो’, ‘रंगीत आकर्षक वेस’ असे नावीन्यपूर्ण प्रकार आतषबाजीतून हाताळले जाणार आहेत. याबरोबरच गावातील अनेक मंडळांकडून घरगुती भक्तांकडून सुखकर दारुकामासाठी प्रयत्न केले जात आहेत.यात्रेनिमित्त स्वच्छता, सफाई, रंगरंगोटी, विद्युत रोषणाई करून सजावट करण्यात आली आहे. सुरक्षिततेच्यादृष्टीने उपविभागीय पोलीस अधिकारी अनिकेत भारती, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश बनकर यांनी यावेळी बैठका घेऊन सूचना दिल्या आहेत. (वार्ताहर)यंदाच्या सोहळ्यासाठी खास आकर्षण म्हणून ‘स्टार डिजिटल औटांची सलामी’, सिध्दराज मंदिराच्या प्रवेशद्वाराची प्रतिकृती’, ‘आॅलिम्पिक फायर शो’, ‘झुंबर औटांची बरसात’ याबरोबरच ‘मतदान जागृती अभियान’ असे विषय दारुकामातून हाताळण्यात येणार आहेत.
कवठेएकंदला आज पारंपरिक आतषबाजी
By admin | Published: October 02, 2014 11:41 PM